गेहलोत, पायलट यांचे राजस्थानराज सुरू

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपदाची घेतली शपथ

जयपूर: कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी सोमवारी राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाची; तर त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे त्या राज्यात कॉंग्रेसराज सुरू झाले आहे.  येथील ऐतिहासिक अल्बर्ट हॉलमध्ये झालेल्या सोहळ्यात राज्यपाल कल्याण सिंह यांनी गेहलोत आणि पायलट यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.

यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, मावळत्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी, द्रमुकचे अध्यक्ष एम.के.स्टॅलिन, नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूक अब्दुल्ला, राजदचे नेते तेजस्वी यादव, झामुमोचे हेमंत सोरेन, झाविमोचे बाबूलाल मरांडी आदी नेत्यांच्या उपस्थितीमुळे भाजपविरोधी पक्षांच्या एकीचे दर्शन या सोहळ्यात घडले.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने बाजी मारत राजस्थानच्या सत्तेवरून भाजपला दूर केले. त्यामुळे त्या पक्षांना आलटून-पालटून सत्ता मिळण्याची राजस्थानमधील परंपरा कायम राहिली. गेहलोत यांच्याकडे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची धुरा आली आहे. तसा मान मिळणारे ते त्या राज्यातील चौथे नेते आहेत. पायलट यांनी पारंपरिक फेटा (साफा) परिधान करून शपथ घेतली. कॉंग्रेस सत्तेत परतत नाही तोपर्यंत साफा परिधान करणार नाही, अशी शपथ त्यांनी 2014 मध्ये घेतली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)