पिंपरी – “मी जात-पात पाळत नाही, इथे किती पाळतात हे माहीत नाही. मात्र, आमच्या इथे बंद झाली आहे. कारण मी सगळ्यांना सांगितलेलं आहे. जातीच नाव काढेल त्यांना ठोकून काढेन. जातीयवाद आणि संप्रदायिकतेपासून मुक्त, आर्थिक, सामाजिक, समता, एकता याच्या आधारावर संपूर्ण समाजाचे संघटन झाले पाहिजे आणि या समाजात गरीब श्रीमंत असता काम नये, एकात्म, अखंड असा समाज तयार झाला पाहिजे,’ असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना दिला.
क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित पुनरुत्थान समरसता गुरुकुलमला भेट दिली. यावेळी डिजिटल सायन्स लॅबचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. गुरुकुलमला 5 कोटी रुपयांचा निधी यावेळी गडकरी यांनी देण्याचे जाहीर केले.
पुढे बोलताना गडकरी म्हणाले,
“निवडणुकीचे तिकीट मिळण्यासाठी राजकीय मंडळी फार आटापिटा करतात. पण ऐनवेळी पक्षाने तिकीट नाही दिले तर नाराज होतात. हा प्रघात मोठ्या प्रमाणात आहे. सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तिकीट मिळाले नाही, तर पक्ष देईल त्या उमेदवारासोबत उभे राहावे. स्वतःसाठी काम न करता पक्षासाठी काम करावे. पक्ष मजबूत होणं महत्वाचं आहे. त्यातूनच निवडणुकांना बळ मिळणार आहे.’