भविष्यातील वाढते खर्च आणि गुंतवणुकीची सवय (भाग-१)

गुंतवणुकीची चांगली सवय स्वतःला लावण्याची सुरवातकरण्याचे पहिले पाऊल म्हणजे म्युच्युअल फंडात एसआयपी सुरु करणे. कारण त्यातूनच तुम्ही कमावत असलेल्या पैशातून दरमहा काही रक्कम गुंतवण्याची सवय लागते. सातत्याने आणि दीर्घकालीन केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीमुळे निर्माण होणाऱ्या परताव्याकडे पाहून पुन्हा गुंतवणूक वाढवण्यास प्रत्येकजण प्रोत्साहित होतो. दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी योग्य ठिकाणी गुंतवणुकीची सवय लावून घेण्याखेरीज पर्याय नाही. कमावलेला प्रत्येक पैसा अनेक गरजांसाठी (आवश्यक व अनावश्यक) खर्च होत असतो. अनेकवेळा गरजेशिवायही मोठे खर्च केले जातात. क्रेडिट कार्ड, त्वरीत उपलब्ध होणारी कर्जे इत्यादी मार्गाने न कमावलेल्या पैशाचाही वापरही जर अनावश्यक गोष्टींवर खर्च केल्यास दैनंदिन उत्पन्नातील मोठा भाग अशा कर्जाच्या परतफेडीसाठी वापरावा लागतो. यातून मोठा मानसिक ताण निर्माण होतो. या संपूर्ण प्रकारात गुंतवणूक व बचत करणे जवळपास अशक्य होऊन जाते.

अचानक पुढे उभे ठाकणारे खर्च, नजीकच्या काळातील दिसत असलेले संभाव्य खर्च व सर्वात महत्त्वाचे म्हणजे दीर्घकालीन उद्दीष्ट ठरवून त्यासाठीची गुंतवणूक यासाठी कोणतीही आर्थिक तयारी न केल्यास प्रत्यक्षात पैशांची गरज निर्माण झाल्यावर पैसे उभे करणे मोठे जिकिरीचे ठरते. यासाठी प्रत्येकाने आपल्यामध्ये पैसा वाचवण्याची व वाचवलेले पैसे योग्य गुंतवणूक साधनांमध्ये गुंतवण्याची सवय लावून घेणे गरजेचे आहे. पैशाबाबत एक म्हण आहे –आज तू मला वाचव, उद्या तुझ्या गरजेच्या वेळी मी तुला वाचवेन. म्हणजेच जर आपण आज पैसे बचतीच्या स्वरुपात बाजूला काढले व ते योग्य ठिकाणी गुंतवले तर भविष्यात त्यातून मोठी रक्कम उभी राहते व नेमक्या मोठ्या गरजेच्या वेळी या रकमेचा वापर करता येतो आणि मग अशावेळी कोणतीही कर्ज घेण्याची वेळ येत नाही.

संपत्ती निर्माण करण्यासाठी पारंपारिक गुंतवणूकदारांसमोर आता नवे गुंतवणूक पर्याय निवडण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. सामान्य गुंतवणूकदाराला देशात व परदेशात दररोज निर्माण होणाऱ्या गुंतवणूक संधी विषयी नेमके ज्ञान असत नाही. त्यामुळे अनेकदा पैसे असूनही त्यातून मोठ्या प्रमाणावर संपत्ती निर्माण करण्याची संधी साधता येत नाही. याचसाठी आर्थिक क्षेत्रातील तज्ञ जर अत्यंत कमी खर्चात आपल्याकडील पैसा योग्य संधीमध्ये गुंतवणार असतील तर यामुळे होणारी संपत्ती मोठी होणार असेल तर याबाबत निश्चित विचार करावयास हवा.

भविष्यातील वाढते खर्च आणि गुंतवणुकीची सवय (भाग-२)

या सर्वांसाठी भारतात १९६४ पासून उपलब्ध झालेल्या म्युच्युअल फंडांच्या योजना या उत्तम पर्याय ठरत आहेत. आज बाजारात दीड हजारांपेक्षा जास्त योजना कार्यरत आहेत. ४२ पेक्षा जास्त म्युच्युअल फंडांच्या कंपन्या आपले तज्ञ फंड मॅनेजर गुंतवणूकदारांसाठी विविध योजनांमार्फत गुंतवणुकीसाठी उपलब्ध करून देत आहेत. अगदी एक दिवसाच्या गुंतवणूक गरजेपासून २५ ते ५० वर्षांपर्यंतच्या गुंतवणूक गरजेसाठी अनेक आर्थिक गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)