मायणी वनक्षेत्रात समाजकंटकाने लावली आग

वन कर्मचारी, ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आग आटोक्‍यात : वनसंपदा वाचली

मायणी – मायणी, ता. खटाव येथील इंदिरा गांधी पक्षी आश्रयस्थानाजवळील वनक्षेत्राला समाजकंटकाकडून आग लावण्यात आली. आग लागल्याचे समजताच वन कर्मचारी व ग्रामस्थांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेवून आग आटोक्‍यात आणली. यामुळे वनसंपदेची हानी टळली. मायणी येथील गांधी पक्षी आश्रयस्थान महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. 65 हेक्‍टर क्षेत्र असलेल्या या पक्षी आश्रयस्थानात मोठे वन उद्यान आहे. या वनक्षेत्रामधे विविध झाडांची लागवड करण्यात आली आहे.

शुक्रवारी दुपारी समाजकंटकाकडून या वनक्षेत्राला आग लावण्यात आली. यावेळी वनक्षेत्राच्या मार्गातून भारतमाता विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य शशिकांत खैरमोडे तेथून जात होते. त्यांच्या निदर्शनास आग आल्यानंतर त्यांनी दूरध्वनीवरून लगेच मायणी फ्रेंड्‌स ग्रुपचे अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी महेश जाधव व अंकुश चव्हाण यांच्याशी संपर्क साधला व वनक्षेत्राला आग लागल्याची माहिती दिली. वनसंपत्तीला आग लागल्याची माहिती मिळताच महेश जाधव यांनी मायणी ग्रामस्थांना ही घटना कळवली.

मायणी ग्रामस्थांनी अभयारण्याकडे धाव घेतली. यानंतर वनकर्मचारी व मायणी ग्रामस्थ व रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या महिला या सर्वांनी आग आटोक्‍यात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे मायणीची वनसंपदा वाचवण्यात यश आले आहे. आग आटोक्‍यात आणण्यासाठी वनपाल काश्‍मीर शिंदे, मोहन शिंदे, दादा लोखंडे, राजाराम माने, मोहन जाधव, पोलीस पाटील प्रशांत कोळी, फ्रेंड्‌स ग्रुपचे अध्यक्ष महेश जाधव, प्रकाश प्रमुख, संदीप कुंभार अंकुश चव्हाण, सुमित कोळी, स्वप्निल कांबळे, तेजस जवारे, श्रीकांत सुरमुख, विशाल चव्हाण, डॉ. सुशांत कोळी, संदीप माळी, लखन सुखदरे, विलास सोमदे, मनोज माने आणि रोपवाटिकेतील महिला वर्ग यांनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)