पुणे – कचरा डेपो आंदोलन अखेर मागे

पदाधिकारी, अधिकाऱ्यांशी चर्चा : विविध आश्‍वासने

पुणे – उरळी देवाची येथील ग्रामस्थांचे दोन दिवसांपासून सुरू असलेले कचऱ्यासंदर्भातील आंदोलन गुरूवारी मागे घेण्यात आले. महापालिकेतील पदाधिकारी आणि प्रशासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
महापालिकेत झालेल्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. अतिरिक्त महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या कार्यालयात ग्रामस्थांनी भेट दिली. यावेळी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, सह महापालिका आयुक्त सुरेश जगताप, स्थानिक नागरिक आदी उपस्थित होते. उरूळी देवाची आणि फुरसुंगी गावातील नागरिकांनी कचरा डेपो येथे आंदोलन सुरू केले होते. निंबाळकर यांनी गेल्या आठवडाभरापासून फुरसुंगी भागात भेट देऊन कामांची पाहणी केली तसेच विविध विभागातील अधिकाऱ्यांशी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला.

-Ads-

नागरिकांनी विचारले विविध प्रश्‍न
याशिवाय फुरसुंगी ग्रामपंचायतीच्या वतीने वॉर्ड क्र. 1 ते 6 मधील सर्व सदस्यांच्या संमतीने आणि जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने विविध विकास कामांची यादी महापालिकेला मिळाली आहे. त्यामधील क्रमनिहाय कामे, वॉर्ड क्र. 1 मधील विकास कामे, सुरू असलेले, पूर्ण झालेले, ग्रामपंचायत दप्तरी नोंद असलेले अशा बांधकामाबाबत आणि अस्तित्त्वात असलेल्या बांधकामाबाबत महापालिकेच्या वतीने धोरण काय असणार, जन्ममृत्यूू दाखले, मृत्युचे पास, टॅक्‍स पावती, विविध कागदपत्रे ग्रामस्थांना कधी उपलब्ध होतील तसेच फुरसुंगी गावाचा विकास आराखडा किती दिवसात प्रसिद्ध करण्यात येईल, या संदर्भात प्रश्‍न उपस्थित करण्यात आले.

काय आहेत गावकऱ्यांच्या मागण्या?
गावातील प्रलंबित कामे आणि देण्यात आलेल्या आश्वासनांची विकास कामे नियोजनबद्ध पूर्ण केली जावीत, प्रामुख्याने ओपन डम्पिंग कायमस्वरूपी बंद करणे, मुख्यमंत्र्यांशी बोलून बैठकीतील निर्णयावर अंमलबजावणी करणे, शेतजमीन अधिगृहीत झाल्या आहेत. त्या बाधित शेतकऱ्यांच्या वारसाला महापालिका सेवेत कायम तत्त्वावर घेणे, भेकराईनगर ते फुरसुंगी गाव रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण, मंतरवाडी ते सोलापूर रस्ता एक्‍स्प्रेस ड्रेनेज लाइन कामे, मंतरवाडी चौक ते फुरसुंगी गावातून सोलापूर रस्त्यावर जाणाऱ्या कॅनॉलवरीलपुलाचे काम अशा कामांची यादी येथील स्थानिकांनी दिली आहे.

काय आश्‍वासन दिले प्रशासनाने?
23 कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत कधीपासून सामावून घेण्यात येईल, नवीन बांधकाम परवाने देण्याचे काम किती दिवसात सुरू करण्यात येईल, चोरघडे मळा येथील नाला स्वच्छता, पवार आळी येथील साठलेल्या पाण्याचा कालवा साफ करणे, मंतरवाडी भागासाठी बंद लाइनमधून पिण्याचे पाणी, ढमाळवाडी ते सासवड रस्ता पूर्ण करणे, रेल्वे गेट ते वडकी फुरसुंगी शिव रस्ता याचे काम, रिंग रस्त्याबाबत खुलासा, बांधकामांना नोटीस या प्रश्‍नांसंदर्भात निंबाळकर यांनी खुलासा केला. या विकास कामांचा आढावा वेळोवेळी घेतला जाईल आणि दोन महिन्याच्या अंतराने ही आढावा बैठक घेतली जाईल, असे निंबाळकर यांनी आंदोलकांना सांगितले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
2 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)