फुरसुंगीत कचराभूमीवर ग्रामस्थांचा ठिय्या

पालिका अधिकाऱ्यांची शिष्टाई निष्पळ : न्यायालयाच्या निर्देशानुसार कचऱ्याची विल्हेवाट लावा

फुरसुंगी – फुरसुंगी येथील कचरा डेपोप्रश्‍नी पंधरा महिन्यांनंतरही समाधानकारक तोडगा निघाला नसल्यामुळे आक्रमक ग्रामस्थांनी बुधवारी सकाळपासून कचराभूमीवर ठिय्या मारला. यावेळी पालिका अधिकाऱ्यांनी दोन तास चर्चेव्दारे पुन्हा शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आश्‍वासक तोडगा निघाला नाही. न्यायालयाच्या निर्देशानुसार कचऱ्याची विल्हेवाट लावा, या भूमिकेवर ठाम राहत ग्रामस्थांनी ही चर्चा फोल ठरविली. ओपन डम्पिंग करण्यास तीव्र विरोध केला. त्यामुळे पालिकेची कचऱ्याची एकही गाडी फिरकली नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

येथील कचरा डेपोप्रश्‍नी एप्रिल 2017 मध्ये आंदोलन झाले होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करून कचरा डेपो बंद करण्यासाठी व इतर मागण्यांसाठी कृतिबंध आराखडा आखून त्याची अंमलबजावणी करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यावर ग्रामस्थांनी ओपन डम्पिंगसाठी नऊ महिन्यांची मुदतवाढ दिली होती. परंतु 15 महिने उलटले तरी मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांनी एकजूट दाखवित आज सकाळपासून कचरा डेपोवर जाऊन कोणतेही आंदोलन न करता केवळ न्यायालयाने ठरवून दिलेल्या नागरी घनकचरा अधिनियम 2000 च्या निर्देशानुसार उघड्या जमिनीवर ओपन डम्पिंग करू नये, नियमबाह्य पध्दतीने येथे कचरा टाकू नये असा पवित्रा घेतला. त्यावर तोडगा काढण्यासाठी आलेले महापालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त राजेंद्र निंबाळकर व ग्रामस्थांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली. मात्र, ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने तोडगा निघाला नाही. दरवेळी आश्‍वासने देवून वेळ मारुन नेतात. पुढचे आंदोलन उभे राहिपर्यंत काहीच कार्यवाही होत नाही. त्यामुळे यावेळी ग्रामस्थांनी कोणत्याही आश्‍वासनाला बळी न पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पालिकेची कोंडी झाली आहे.

विशाल हरपळे म्हणाले, एप्रिल 2017 मध्ये झालेल्या आंदोलनाच्यावेळी मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करुन हे आंदोलन स्थगित केले होते.यावेळी कचराडेपो बंद करणे, कचराडेपो बाधित 62 मुलांना पालिकेत कायमस्वरुपी नोकरी, डेपोच्या वापरात नसलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी परत देणे, गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी फिल्टर प्लॉंट उभारणे, मुख्य रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, एक्‍स्प्रेस ड्रेनेज लाईन, मंतरवाडी बायपास रोड करणे, आदी विकासकामे करून ओपन डम्पिंग बंद करणे यासाठी नऊ महिन्यांची मुदतवाढ दिली होती. परंतु 15 महिने उलटले तरी कोणतेच आश्‍वासन पूर्ण न झाल्याने व कचऱ्याचा उंचच डोंगर वाढत असल्याने येथील नागरिकांच्या जीवन-मरणाचा प्रश्‍न निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरी घनकचरा अधिनियम 2000 नुसार न्यायालयाने ठरवून दिलेल्या निर्देशानुसार कचऱ्याची विल्हेवाट लावावी. याठिकाणी नियमबाह्य कचरा टाकू देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

आंदोलन दडपण्यासाठी आमच्यावर कायदेशीर कारवाई करणेही आता कठीण आहे. कारण आम्ही आंदोलन करत नाही तर केवळ न्यायालयाच्या नियमानुसार कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची मागणी करत आहे. त्यामुळे नियमानुसार ओपन डम्पिंग करणे हा कायद्याने गुन्हा आहे. तो गुन्हा गेल्या 20 वर्षांपासून पालिकाच करत आहे. त्यामुळे कचरा डेपोच्या नरकयातना थांबल्याशिवाय आता माघार नाही, असे त्यांनी सांगितले.

सकाळी नऊपासून फुरसुंगीचे ग्रामस्थ कचरा डेपोवर जाऊन बसले होते. परंतु पालिकेची एकही कचरागाडी डेपोवर फिरकली नाही. त्यानंतर पालिकेतून ग्रामस्थांना निरोप आला की, दुपारी दोन वाजता अतिरिक्‍त आयुक्‍त राजेंद्र निंबाळकर व अधिकारी ग्रामस्थांसोबत चर्चा करण्यासाठी येणार आहेत. त्यानुसार दुपारी दोन तास चर्चा होऊनही ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने आयुक्‍तांची शिष्टाईही निष्फळ ठरली. त्यामुळे कचरा कोंडी अटळ आहे.

ग्रामस्थ नागेश हरपळे म्हणाले, दरवेळी आमच्या समंजसपणाचा पालिका प्रशासन गैरफायदाच घेत आहे. दरवेळी मुदतवाढ घ्यायची आणि पुढचे आंदोलन सुरू होईपर्यत काहीही उपाययोजना करायच्याच नाहीत. आंदोलनांच्या वेळी मोठमोठी आश्‍वासने द्यायची आणि नंतर ती विसरुन जायची, अशीच भूमिका गेली 20 वर्षे पालिका प्रशासन घेत आले आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी दोनवेळा आश्‍वासन देऊनही कोणतीच कार्यवाही झालेली दिसत नाही. यावरून कचरा डेपोच्या प्रश्‍नावर पालिका प्रशासन किती गंभीर आहे ते दिसते. कचरा डेपोचा प्रश्‍न कायमचा मिटवण्यासाठी कृतिबंध आराखडा ग्रामस्थांशी चर्चा करून निश्‍चित करण्याचे ठरले होते. नऊ महिन्यांत ओपन डम्पिंग पूर्ण बंद करण्याचे ठरले होते. परंतु असे काहीच झाले नाही. त्यामुळे पालिका व राज्य शासन सर्वसामान्य जनतेची केवळ दिशाभूल करून वेळ मारून नेण्यातच धन्यता मानत असल्याचे यातून दिसून येते. त्यामुळे आता कायमस्वरुपी कचरा डेपो बंद झाल्याशिवाय माघार न घेण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य शंकर हरपळे, माजी सरपंच संजय हरपळे, दिनकर हरपळे, विशाल हरपळे, संदीप हरपळे, नागेश हरपळे, दादा कामठे, बाजीराव सायकर, अनिल टिळेकर, विजय हरपळे, प्रवीण हरपळे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)