दिवाळीच्या सुट्टयांनी कामकाज ठप्प

शासकीय कार्यालयांत शांतता; नागरिकांची कामे रेंगाळली

सोमवारपासून कामकाज सुरू होणार सुरळीतपणे

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – दिवाळीनिमित्त सर्व शासकीय कार्यालयांना सलग सहा दिवस सुट्टया मिळाल्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांची चांगलीच दिवाळी साजरी झाली. कार्यालये बंद असल्यामुळे नागरिकांची विविध कामे मात्र रेंगाळली आहेत. आता थेट सोमवारीच कार्यालये सुरु होणार असून त्यानंतर शासकीय कामकाज नियमित चालू राहणार आहे.

पुणे शहरात महत्वाच्या विभागाची अनेक शासकीय कार्यालये आहेत. या कार्यालयांमध्ये नागरिकांची नेहमी ये-जा सुरूच असते. पहिल्यांदाच दिवाळीनिमित्त सर्वच शासकीय कार्यालयांना सलग सुट्टया मिळाल्या आहेत. मंगळवारी (दि.6) नरकचर्तुदशीनिमित्त जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारात एक दिवस स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यानंतर बुधवारी (दि.7) लक्ष्मीपूजन, गुरुवारी (दि.8) दिपावली पाडवा, शुक्रवारी (दि.9) भाऊबीज अशा दिवाळीच्या सुट्टया शासकीय कार्यालयांना मिळाल्या आहेत. शासकीय कार्यालयांना महिन्यातील दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुट्टी सुट्टीच असते. त्यामुळे शनिवारी (दि.10) एक दिवसाची सुट्टी वाढली. त्यात रविवारच्या (दि.11) साप्ताहिक सुट्टीने आणखी भर पडली आहे. याप्रमाणे चालू आठवड्यात मंगळवारपासून रविवारपर्यंत सलग सहा दिवस कार्यालयांना सुट्टया मिळाल्यामुळे शासकीय कार्यालये बंदच राहिल्याने सर्वच कामकाज ठप्प झाले आहे.

विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय याबरोबर महापालिका, जिल्हापरिषद, नवीन प्रशासकीय इमारत, सेंट्रल बिल्डींग, शिक्षण संचलनालय, उच्च शिक्षण सहसंचालक, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे विभाग शिक्षण सहसंचालक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आदी प्रमुख कार्यालयांना सलग सुट्टया मिळाल्या आहेत. नोंदणी व मुद्रांक शुल्क, निवडणूक, महसूल, नागरी सुविधा केंद्र, भूमिअभिलेख, भूसंपादन, शिक्षण, आरोग्य, रोजगार हमी योजना, करमणूककर, नियोजन, निवाडा, मागासवर्ग कक्ष, विभागीय चौकशी, विकास योजना, तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम, अन्नधान्य पुरवठा, जलसंपदा या कार्यालयात प्रामुख्याने नागरिकांची नेहमीच कोणत्या ना कोणत्या कामानिमित्त गर्दी होत असते.

सलग सुट्टयांमुळे शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. या सर्वांची चांगलीच दिवाळी साजरी झाली असली, तरी नागरिकांची मात्र मोठी गैरसाय झाली आहे. आता थेट सोमवार (दि.12) पासूनच सर्व शासकीय कार्यालये सुरळीतपणे सुरू राहणार आहेत. ठप्प झालेली कामे पुढच्या आठवड्यातच मार्गी लागण्याची शक्‍यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)