कार्यक्षम बॅटरी विकसन संशोधनाला येणार गती

एआरएआय, एनसीएलमध्ये करार : रासायनिक व बॅटरी इंजिनिअरिंगवर भर

पुणे – सध्याची परिस्थिती पाहाता भविष्यात इलेक्‍ट्रिक मोबिलिटी वाहनांची संख्या वाढविणे काळाची गरज आहे. भविष्यात येऊ घातलेल्या या इलेक्‍ट्रिक गाड्यांमध्ये त्याची बॅटरी हा महत्त्वाचा घटक असणार असून कार्यक्षम बॅटरी विकसित करण्यासाठी त्यावरील संशोधनाला गतिमान करण्याची गरज आहे. अशा प्रकारच्या बॅटरी विकसित करीत त्याचे एकत्रित संशोधन गतीमान करण्याच्या उद्देशाने दि ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) आणि राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला.

-Ads-

एआरएआयच्या संचालिका रश्‍मी उर्ध्वरेषे आणि एनसीएलचे संचालक अश्‍विनी कुमार नांगिया यांनी बुधवारी एआरएआयमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. एआरएआयचे वरिष्ठ उपसंचालक व टेक्‍नॉलॉजी ग्रुपचे प्रमुख एम. आर. सराफ, एनसीएलच्या वरिष्ठ संशोधक डॉ. मंजुषा शेळके आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना वर नमूद क्षेत्रात आपापल्या संस्था काय काम करीत आहेत या विषयीचे सादरीकरण केले.
उर्ध्वरेषे म्हणाल्या, इलेक्‍ट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी आवश्‍यक असलेल्या जास्त क्षमतेच्या, कार्यक्षम बॅटरी विकसित करण्यासाठी संशोधनाला गतिमान करण्याची गरज आहे. यासाठी दोन संस्था एकत्र येत आहेत. ज्यामध्ये मूलभूत सामग्री संशोधन (फंडामेंटल मटेरियल रिसर्च) क्षेत्रात असलेली एनसीएलची ताकद तर एआरएआयला असलेले वाहन उद्योगाशी संबंधित तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि या विषयीचा असलेला प्रदीर्घ अनुभव यांचा मेळ घातल्यास हे सहज शक्‍य होईल. हा सामंजस्य करार करीत असताना सुरुवातीला ऑटोमोटिव्ह ऍप्लिकेशन्ससाठी रासायनिक व बॅटरी इंजिनिअरिंगवर अधिक भर देण्यात येईल. या दोन संस्थांमधील भागिदारी ई- गतिशीलतेमध्ये (ई -मोबिलिटीमध्ये) योग्य संशोधन आणि विकास होण्याच्या प्रक्रियेला गती देईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

प्रा. अश्‍विनी कुमार म्हणाले, नीती आयोगाने इंधनाची आयात कमी व्हावी या उद्देशाने जी पावले उचलण्याचे ठरविले आहे, त्या दृष्टीने भविष्यात एआरएआय आणि एनसीएल यांना आणखी काम करता येईल. यामध्ये प्रामुख्याने बॅटरीचा पुनर्वापर, इलेक्‍ट्रिक मोबिलिटीमधील वाढ, कॅटेलिस्ट डेव्हलपमेंट आदी क्षेत्रांचा समावेश असेल, असे त्यांनी नमूद केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)