फुल्ल टू मसाला’सिम्बा’

दिग्दर्शक रोहित शेट्टी यांने  ‘सिंघम’ मधून एक वेगळा पोलीस अधिकारी बॉलीवूड मध्ये आणला, तसा तो यापूर्वी दाक्षिणात्य चित्रपटात होता. अजय देवगनचा स्मार्ट पोलीस अधिकारी सिंघममध्ये यशस्वी झाल्यावर रोहितने ‘सिम्बा’मधून त्याला आणखी हुशार आणि भावनिक करत रणवीर सिंगला संग्राम भालेराव नावाने मराठी पोलीस इन्स्पेक्टर म्हणून पुढे आणलं आहे. कथेत फारसे नाविन्य नसले तरी मांडणी चांगली झाली आहे.

‘सिम्बा’ची कथा सुरु होते ‘सिंघम’च्याच शिवगड येथून. केवळ पैसे कमावण्यासाठी संग्राम भालेराव उर्फ सिम्बा (रणवीर सिंह) हा तरुण पोलीस दलात भरती झाला आहे. दरम्यान त्याची बदली मिरामार येथे होते, तिथे त्याची मैत्री दुर्गा यशवंत रानडे (सोनू सुद) या गुंडाशी शी होते. याच वेळी तो शगुन (सारा आली खान) च्या प्रेमात पडतो. दरम्यान एका तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेमुळे त्याला आपल्या कर्तव्याची जाणीव होते. मग तो या प्रकरणात असलेल्या आरोपींना अटक करतो, पण आरोपी दुर्गा रानडेचे भाऊ आहेत, पुढे काय होणार याची कल्पना प्रेक्षकांना अगदी सहज येते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दिग्दर्शक रोहित शेट्टी विषयाचं गांभीर्य मनोरंजनापेक्षा जास्त डोईजड होणार नाही. याची काळजी घेत असतो हे अनेकदा दिसून आले आहे, ‘सिम्बा’ सुद्धा त्याला अपवाद नाही. चित्रपटाची कथा छोटी असतानाही पटकथा आणि संवादावर काम करून विषय प्रेक्षकांच्या गळी उतरवण्यात दिग्दर्शक म्हणून तो यशस्वी झाला आहे. मध्यंतराआधीचा संपूर्ण पडदा रणवीर सिंगला कमालीचा भ्रष्ट अधिकारी ठरवण्यातल्या प्रसंगांनी व्यापलेला आहे. त्यांनंतर खऱ्या अर्थाने मुख्य विषयाला हात घालण्यात आला आहे. रोहित शेट्‌टीच्या चित्रपटामध्ये सर्व गोष्टी कायम लाऊड असतात. ‘सिम्बा’ मध्येही त्या आहेत, इथला नायक  आत्मकेंद्री आहे. तो स्वतःला आणि पोलिसांच्या कामला गांभीर्याने घेत नाही. तसेच तसेच नव्या पिढीच्या प्रेक्षकांना थेट न्याय निवाडा करण्यावर विश्वास वाटतो,  आताच्या बदलत्या सामाजिक मूल्यांचा परिणाम चित्रपटांच्या कथानकावरही झालेला आहे.

पुरावा नष्ट करण्यासाठी खलनायक गुंड मंडळी कुठल्याही थरापर्यंत जाऊ शकतात. हे या संग्राम भालेरावच्या लक्षात कसं येत नाही, असे काही प्रश्न प्रेक्षकाला पडतात, मात्र त्याकडे दुर्लक्ष करून चित्रपटाचा आनंद घेता येऊ शकतो.
कलाकारांच्या अभिनयाबद्दल सांगायचे तर रणवीर सिंहने संग्राम भालेराव या व्यक्तीरेखेला शंभर टक्के न्याय दिला आहे. सुरुवातीला एक भ्रष्ट पोलीस अधिकारी नंतर अँग्री मॅनमध्ये कसा बदलतो, हे त्याने उत्तम साकारले आहे. सारा आली खानच्या वाट्याला दोन गाण्या पलीकडे काही आलेले नाही.

सोनू सूदने आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला. आशुतोष राणा सिम्बाचे हेड कॉन्सटेबल बनले असून त्यांनी दमदार अभिनय केला आहे. सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी, अरुण नलावडे, विजय पाटकर, सुचित्रा बांदेकर, सुलभा आर्य, अश्विनी काळसेकर आदी मराठी कलाकार यात दिसतात आणि प्रत्येकाने आपले काम चोख बजावले आहे. अजय देवगनला एन्ट्री देऊन सिंघमचा फिव्हर सिम्बामध्येही आणण्याचा प्रयत्न  झाला आहे.

थोडक्यात सांगायचे तर बलात्कारासारख्या गुन्ह्याविरोधात समान्यांमध्ये प्रचंड चिड असते. काळ बदलला तरी अत्याचार्यांाची मानसिकता बदलेली नाही, हे सिम्बा सांगण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला रोहित शेट्टीचे चित्रपट आवडत असतील, रणवीर सिंहचे तुम्ही चाहते असाल तर ‘सिम्बा’ तुमच्यासाठीच आहे.

चित्रपट – सिम्बा 
निर्मिती – करण जोहर , रोहित शेट्टी, अपूर्व मेहता
दिग्दर्शक – रोहित शेट्टी 
संगीत – तनिष्क बागची,
कलाकार – रणवीर सिंह, सारा अली खान, आशुतोष राणा, सोनू सूद, सिद्धार्थ जाधव, सुचित्रा बांदेकर, वैदेही परशुरामी, विजय पाटकर
रेटिंग – ***
भूपाल पंडित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)