पुणे – निराश तरुणाईला नशेची झिंग

– अर्जुन नलवडे

पुणे – मधू (वय-28, नाव बदलले आहे) शिक्षण घेत होता. अभ्यासाच्या तणावामुळे आणि कुटुंबाच्या दबावाखाली नैराश्‍याने ग्रासलेल्या मधूने दोन वर्षांपूर्वी हॉस्टेलमधील मित्रांच्या आग्रहामुळे एका वाढदिवसाच्या पार्टीत सुरुवातीला दारू प्यायली. परीक्षेत सतत नापास होणे, त्यावरून कुटुंबियांची खावी लागणारी बोलणी यामुळे तो दारूच्या पूर्णत: आहारी गेला. मात्र, त्याच्यावर सध्या व्यसनमुक्ती केंद्रात दोन महिन्यांपासून उपचार सुरू आहेत. ही काही एका तरुणाची गोष्ट नव्हे तर व्यसनमुक्ती केंद्रातून दारूच्या व्यसनासंबंधी उपचार घेत असलेल्या अनेक तरुणांची अशीच गोष्ट आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दारूच्या व्यसनात अडकलेल्या तरुणांची संख्या जास्त आहे. त्यातून विद्यार्थी दशेतील तरुण सर्वाधिक आहेत. सतत अभ्यासाचा ताण, परीक्षेतील मार्कांची घसरण, नापास होण्याची भीती, बेरोजगार असल्याची खंत, नोकरीसाठीची जीवघेणी धडपड, सहज उपलब्ध होणारी व्यसने, आनंद व्यक्त करण्यासाठी आणि दुःख विसरण्यासाठी, नोकरीतील तणाव, जोडीदाराच्या अवास्तव अपेक्षा त्यातून होणारी आर्थिक कुंचबना, अनेक हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांतून दाखवली जाणारी दारू संबंधिची दृष्ये या सर्व कारणांमुळे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर आणि अनेक तरुणांवर दुष्परिणाम होत आहेत.

भारतात एकूण लोकसंख्येच्या 14.6 टक्‍के लोक दारूच्या आहारी गेले आहेत. त्यातील 27.3 टक्‍के पुरूष, तर 1.6 टक्‍के महिला आहेत. तसेच 10 ते 17 वयोगटातील लहान मुलांची संख्या 1.3 टक्‍के आहे. त्यामध्ये 18 वर्षांपुढील 17.1 टक्‍केलोक दारूच्या विळख्यात अडकलेले आहेत. यामध्ये प्रथम क्रमांक छत्तीसगड या राज्याचा लागतो. तर, लक्षद्विप या केंद्रशासित प्रदेशात दारू पिणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. महाराष्ट्रात 3.8 टक्‍केलोक हे दारू पिणारे आहेत. त्यात पुरुषांची संख्या 10.2 टक्‍के आहे.

आजचा तरूण दारू, चरस आणि गांजा, सिगारेट आणि इतर तत्सम पदार्थांच्या व्यसनात अडकत आहे. हे एक मोठे चक्रव्यूव्ह आहे. व्यसनाच्या चक्रातून बाहेर पडण्याचे प्रमाण 10 ते 20 टक्‍के इतकेच आहे. त्यामुळे आपल्या पाल्याने व्यसनाच्या विळख्यात अडकू नये, यासाठी अगोदरच पालकांनी दक्षता घेणे, महत्त्वाचे आहे. जरी तो चुकून अडकला, तर त्यातून त्वरित बाहेर काढण्यासाठी पालकांनी डॉक्‍टर, समुपदेशक यांच्या मदतीने प्रयत्न करावेत.
– डॉ. भरत सरोदे, माजी अध्यक्ष, इंडियन सायकॅट्रिक सोसायटी (महा).


बऱ्याच व्यसनमुक्ती केंद्रांत नव्याने दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या सुमारे 30 टक्‍के असते. मात्र, पूर्वी उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्याच 70 टक्‍के असते. याचाच अर्थ फ्रेशर्स कमी आणि जुनेच रुग्ण पुन्हा-पुन्हा उपचारासाठी दाखल होत राहतात. व्यसनमुक्ती केंद्रांतून व्यक्तीला व्यसनातून बाहेर काढणे पुरेपुर प्रयत्न केले जातात. मात्र, केंद्रांतून बाहेर पडल्यानंतर कुटुंबातील सदस्य डॉक्‍टरांनी सांगितलेल्या उपचारपद्धती वेळेवर करत नाहीत. त्या व्यक्तीला व्यसन सुटण्यासाठी आवश्‍यक वातावरण घरातील सदस्य निर्माण करू शकत नाही, परिणामी जुन्या रुग्णांची संख्या ही जास्त असते. त्यामुळे घरातील सकारात्मक वातारण टिकवून ठेवणे, व्यसन सुटण्यासाठी खूप आवश्‍यक असते.
– संजय कुंभार, समुपदेशक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)