पुणे – … यामधूनच देशाची प्रगती होणार

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी : “जनसेवा’ बॅंकेच्या मुख्य कार्यालयाचे उद्‌घाटन

पुणे – व्यक्‍तीकेंद्रीत प्रगतीसाठी संस्कार आणि सामाजिक दृष्टीकोनाची भूमिका तयार करणे गरजेचे असून यामधूनच देशाची प्रगती होणार आहे. हा विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कृतीमध्ये आणला आणि त्याचेच प्रतिबिंब म्हणजे जनसेवा सहकारी बॅंक होय, असे केंद्रीय रस्ते वाहतूक जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी व्यक्त केले.

जनसेवा सहकारी बॅंकेच्या हडपसर येथील मुख्य कार्यालयाच्या नूतन वास्तूचे केंद्रीय मंत्री गडकरी यांच्य हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक प्रा. नानासाहेब जाधव, खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, बॅंकेचे अध्यक्ष प्रदीप जगताप, उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र हिरेमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक जोशी उपस्थित होते.

प्रा. नानासाहेब जाधव म्हणाले की, जनसवेसाठी वचनबद्ध असणारी ही बॅंक असून सामाजिक बांधिलकीचे नाते त्यांनी पहिल्यापासून जपले आहे. यामागे संघाची प्रेरणा आहे. संघाचा मूलगामी विचार बॅंकेच्या वाटचालीसाठी सहाय्यभूत ठरला आहे. स्वयंसेवक घडविणे हे संघाचे काम आहे आणि संघ स्वयंसेवक काय करू शकतो याचे प्रतिक म्हणजे जनसेवा सहकारी बॅंक आहे.

बॅंकेचे अध्यक्ष जगताप म्हणाले की, पूर्व भागात संघ विचाराची आर्थिक संस्था या भावनेतून भिशी मंडळाची स्थापना झाली व त्यातूनच 1972 साली बॅंकेची निर्मिती झाली. गेल्या 47 वर्षात बॅंकेची मोठी प्रगती झाली आहे. हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट येथे बॅंकेच्या मुख्य कार्यालयाची नवीन वास्तू इको ग्रीन बिल्डींग या संकल्पनेतून बांधण्यात आली असून एकूण सात मजले (सुमारे 62 हजार चौरस फूट क्षेत्रफळ) असलेली ही इमारत अत्यंत प्रशस्त झाली आहे. स्वमालकीच्या या इमारतीमध्ये मुख्य कार्यालयाचे सर्व विभाग व डाटा सेंटर राहणार असल्याचेही जगताप यांनी यावेळी सांगितले.

यानिमित्ताने बॅंकेच्या वाटचालीवर आधारित विवेकच्या वतीने स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले तर, बॅंकेचे उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र हिरेमठ यांनी आभार मानले. सुहास शामगावकर यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)