आरक्षण अहवालावरून सत्ताधारी-विरोधकांत जुंपली 

विधानसभेचे कामकाज चारवेळा तहकूब 

गदारोळात पुरवणी मागण्या व विधेयके मंजूर 

मुंबई: मराठा-धनगर आरक्षणाचा अहवाल सभागृहात मांडल्याशिवाय कामकाज होऊ देणार नाही, या भूमिकेवर आजही विरोधक ठाम होते. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांनी मंगळवारीही विधानसभेत गोंधळ घातला. या गोंधळात विधानसभेचे कामकाज चारवेळा तहकूब करण्यात आले. या गदारोळात सरकारने पुरवणी मागण्या व विधेयके मंजूर करून घेतली. सरकारच्या या भूमिकेचा निषेध करीत विरोधी पक्षांनी सभात्याग केला.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पुन्हा अहवाल सभागृहसमोर ठेवण्याची मागणी केली. ते म्हणाले, राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालात नेमकं काय म्हटलंय हे सर्वांना कळू द्या. मागच्या सरकारने 16 टक्के आरक्षण दिले. हे सरकार 20 टक्के, 22 टक्के, किती टक्के आरक्षण देणार आहे. टीसने धनगर समाजाचा दिलेला अहवालही सभागृहासमोर मांडलेला नाही. मुस्लिम समाजाच्या 5 टक्के आरक्षणाबाबतही सरकार कार्यवाही करीत नाही. अहवाल मांडायचा नाही, कृती अहवाल मांडायचा म्हटले जातेय, याचा अर्थ सरकारच्या मनात पाप आहे, असा आरोप करीत जोपर्यंत अहवाल मांडला जात नाही, तोपर्यंत काम चालू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.

ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांनी देखील मराठा तसेच धनगर समाजाबाबतचा अहवाल तातडीने सभागृहात मांडण्याची मागणी केली. अहवाल सभागृहात ठेवायला सरकारला नेमकी कोणती अडचण वाटते हे देखील सरकारने सांगावे असेही ते म्हणाले.

अहवालाबाबत लपवाछपवी? – अजित पवार 
यापूर्वीचे अहवाल मांडले गेले नव्हते, असे सरकारने म्हटले आहे. पण तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यात जमीन अस्मानाचा फरक आहे. 26/11च्या दिवशी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना 27/11 आले तरीही त्यांना सोडण्यात आले नाही. आम्हालाही लोकांनी निवडून दिले आहे. आम्हाला कळले पाहिजे, या अहवालात काय आहे. अहवाल न ठेवता विधेयक आणणे म्हणजे त्यात काही लपवाछपवी आहे का, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री कोण्या एका समाजाचा नसतो, ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची परंपरा आहे. ती परंपरा देवेंद्र फडणवीस यांनी पाळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)