मैत्री, नाती आणि स्व-भान!

प्रत्येक मैत्रीत जिव्हाळ्याच्या नात्यात एक रेष असते. ती आपली आपण ओळखायची असते. कोणत्याही मैत्रीमुळे मित्राचे मित्र, मैत्रिणींचे मित्र/मैत्रिणी, त्यांचे नातेवाईक, त्यांचे कलिग्स आणि आपण असंही मैत्रीचं वर्तुळ वाढत असतं. त्यातही एक रेष असते. ती आपल्याला ओळखता यायला हवी. ती ओळखून तिची मर्यादा पाळायचा प्रयत्न करावा. कितीही जवळचे कितीही मित्र मैत्रिणी, नातेवाईक असले, तरी आपण एकटेच असतो. ह्या गोष्टीचं भान आपल्या आतमध्ये कुठेतरी जिरवून ठेवावं. आपलं मनोरंजन म्हणून हे मैत्रीचे, नात्यांचे टेकू लागू देऊ नयेत. ते असले, तर बोनस समजावा. नसले, तर मूळ पगार चालूच राहील. हाच सुखी, आनंदी आयुष्याचा मंत्र आहे. हे सर्व स्वतःच्या पायावर आर्थिकदृष्ट्‌या उभं राहिल्यावर जितकं लहान वयात कळेल तितकं बरं असतं! खासकरून स्त्रियांसाठी हे समजणं फारच गरजेचं असतं.

कोणाची बायको, कोणाची मुलगी, कोणाची सून, कोणाची बहीण, विशिष्ट मित्र सर्कलमध्ये स्वतःला गुंतवून घेतलं केलं की त्यातून मान्यता मिळणं, अशी आपली ओळख नसावी. त्यापेक्षा आपल्या विशिष्ट चांगल्या कामांसाठी, कामाच्या दर्जासाठी, त्यातल्या सातत्यासाठी आपली ओळख असणं, हे अतिशय महत्वाचं असतं. म्हणूनच सातत्याने आपल्या क्षमतांचा विकास करत राहावं. कोण कोणास आपल्याबद्दल काय म्हणालं, ह्या ही पेक्षा आपण आपल्याबद्दल काय विचार करतो, तेच आयुष्यात सर्वाधिक कामास येतं. आपल्या आयुष्याच्या प्रगतीची मेख तिथेच असते. हे सर्व स्त्रीप्रधान लिहिलं असलं तरी हेच सर्व पुरुषांना आणि थर्ड जेंडरला सुद्धा लागू आहे. तुम्हांला गॉड फादर, गॉड मदर, खोटी स्तुती करून जवळ येणारे, फायद्याची/ स्वार्थाची गणितं मांडून मग तुमच्याशी संबंध ठेवणारे मित्र जितके कमी असतील, तितकं चांगलं असतं. रात्रीची सुखाची झोप, कष्टाची झोप, स्व कमाईच्या आर्थिक स्थैर्याची झोप ह्यातूनच लागते.

– प्राची पाठक

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)