सिंधू, सायनाची उपान्त्यपूर्व फेरीत धडक

फ्रेंच ओपन बॅडमिंटन क्रीडा स्पर्धा 

पॅरिस – पॅरिसमध्ये सुरु असलेल्या फ्रेंच ओपन बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत भारताची फुलराणी सायना नेहवाल, पी.व्ही.सिंधू आणि किदंबी श्रीकांतयांनी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली असून साइ प्रनिथ रेड्डीचे आव्हान मात्र पात्रताफेरीतच संपुष्टात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सायनाने महिला एकेरीच्या गटात जपानची माजी विश्वविजेती नोजोमी ओकुहाराला 10-21, 21-14, 21-17 असे पराभूत केले. तर, सिंधूने सयाकाचा 21-17, 21-16 असा एकतर्फी पराभव केला. तर, श्रीकांतने कोरियाच्या ली डोंग कियुनवर 12-21, 21-16, 21-18 असा विजय मिळवला.

सायना आणि नाजोमी यांच्या सामन्यामध्ये नाजोमीने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत पहिला गेम 21-10 असा जिंकला. त्यामुळे सायनाला सामन्यातील आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी पुढील गेम जिंकणे आवश्‍यक झाले होते. त्यावेळी सायनाने आपल्या सर्व अनुभवाचा वापर करत हा अटीतटीचा गेम 21-14 अशा फरकाने जिंकला. त्यामुळे सामन्यात 21-10, 14-21 अशी बरोबरी झाली होती. त्यामुळे सामन्यातील तिसरा गेम हा दोघांसाठी ही निर्णायक होता.

या गेममध्ये दोनीही खेळाडूंनी आपली सर्व शक्ती पणाला लावली. पण अखेर सायनाने हा गेम 21-17 असा जिंकून सामना आपल्या खिशात घातला. सायनाचा पुढील सामना चिनी तैपईच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या ताय ज्यू यिंग हिच्याशी होणार आहे.

तर, श्रीकांतनेही पुरुष एकेरीच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याने दुसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीत 25 व्या स्थानावर असलेल्या कोरियाच्या डोंग कियुनचा 12-21, 21-16, 21-18 असा पराभव केला. 1 तास 13 मिनिटे रंगलेल्या या सामन्यात पहिला गेम श्रीकांतला 21-12 असा गमवावा लागला होता. मात्र, त्याने आपला सर्व अनुभव पनाला लावताना पुढील दोन्ही गेम आपल्या नावे करत त्याने स्पर्धेतील आपली विजयी आगेकूच कायम ठेवली आहे. श्रीकांतची पुढची लढत माजी विश्वविजेता केंटो मोमोटा याच्याशी होणार आहे.

तर, जागतीक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या सिंधूने जपानच्या सयाका साटोचा 45 मिनिट चाललेल्या सामन्यात एकतर्फी पराभव केला. यावेळी सामन्याच्या पहिल्याच सेट पासून सिंधूने सयाकावर दबाव वाढवला होता. त्यामुळे सयाकोने अनेक चुका केल्या. त्याचाच फायदा उचलताना सयाकोने पहिला सेट 21-17 असा गमावला.

यावेळी सिंधूने दुसऱ्या सेट मध्ये आपल्या भात्यातील स्मॅश आणि ड्रॉप फटक्‍यांचा वापर करताना सयाकाची चांगलीच दमछाक उडवली. त्यातच सयाकाने या वेळी प्रतिकाराचा थोदा प्रयत्न केला मात्र त्यात तिला अपयश आले आणि तिने दुसरा सेट 21-16 असा गमावला.

सिंधूचा सामना आता जागतीक क्रमवारित सातव्या स्थानी असलेल्या चीनच्या हे बिंगजिओशी होणार आहे. तर अन्य एका सामन्यात भारताच्या बी साइ प्रनीथचा इंडोनेशियाच्या जोनेथन ख्रीस्टीने 21-16, 21-14 असा एकतर्फी पराभव करत सामना आपल्या नावे केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)