डॉ. अतुल भोसले यांची ग्वाही
कराड – मनव, (ता. कराड) येथील पत्रकार प्रवीण भंडारे हे गत महिन्यात झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. भंडारे यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांच्यावर मोफत उपचार करण्याबाबत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी डॉ.अतुल भोसले यांची भेट घेवून निवेदन दिले. यावर डॉ. अतुल भोसले यांनी प्रवीण भंडारे यांच्यावर संपूर्ण उपचार मोफत करण्याची ग्वाही दिली.
प्रवीण भंडारे यांचा 14 मे रोजी कोपर्डे येथे दुचाकीवरून अपघात झाला होता. या अपघातात ते जखमी झाले असून ते कोमात गेले आहेत. गेली महिनाभारापासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. शासनाच्या महात्मा फुले आरोग्य योजनेअंतर्गत आत्तापर्यंत त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र या योजनेअंतर्गत पैसे संपल्याने पुढील उपचारांसाठी आर्थिक मदतिची गरज निर्माण झाली होती.
या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी डॉ. अतुल भोसले यांची भेट घेवून संपर्ण परिस्थितीची माहिती दिली. यावर डॉ. भोसले यांनी भंडारे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी संपर्क साधून उपचाराची माहिती घेतली. व यापुढे भंडारे पूर्ण बरे होईपर्यंत त्यांच्यावर मोफत उपचार करण्याची ग्वाही दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रवीण कांबळे व पदाधिकारी उपस्थित होते.