ठेकेदारांवर पालिका मेहरबान; पुरविणार चालकांसह 50 वाहने
पिंपरी – शहरातील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस तीव्र रुप धारण करत असल्याने महापालिका आता ठेकेदाराच्या मदतीला धावली आहे. शहरातील सर्व ठिकाणचा कचरा वेळेवर उचलला जावा, याकरिता या ठेकेदारावर मेहरबान होत प्रशासन या ठेकेदाराला महापालिकेच्या मालकीची 50 वाहने चालकासह अगदी नि:शुल्क पुरविणार आहे. कोट्यवधी रुपयांचा ठेका देऊनही या ठेकेदाराला मदत करण्याच्या महापालिकेच्या भूमिकेने अनेकांच्या भुवया उंचविल्या आहेत.
आरोग्य विभागाने 1 जुलैपासून नवीन कंत्राटदारांमार्फत कचरा संकलन आणि वहनाचे काम सुरु केले आहे. शहराचे दोन भाग करत, उत्तर भागाचे काम बी.व्ही.जी इंडिया लिमिटेड यांना आणि दक्षिण भागाचे ए.जी. एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स यांना कचरा संकलन आणि वाहून नेण्याचे काम देण्यात आले आहे. दोन्ही कंत्राटदारांना आठ वर्षांसाठी हे काम देण्यात आले आहे.
ए.जी. एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स कंत्राटदार करत असलेल्या दक्षिण भागाच्या कचरा संकलन आणि वहन या कामाच्या अनेक तक्रारी आहेत. अ, ब, ग, ड आणि ह परिसरातील कचरा संकलनाची जबाबदारी ए.जी. एन्वायरोकडे यांच्याकडे आहे. स्थायी समितीच्या आजच्या बैठकीत या समस्येवर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये ए.जी. एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स या कंत्राटदाराकडे वाहनांची संख्या कमी असल्याची बाब निदर्शनास आली.
या ठेकेदाराकडे केवळ 58 बीन व 15 कॉम्पॅक्टर असून त्याच्या माध्यमातून केवळ मोठ्या ठिकाणाचा कचरा उचलला जात आहे. त्यामुळे कचरा संकलन करण्यासाठी 23 वाहने वाढविण्याचे कंत्राटदाराने मान्य केले आहे. वाहनांची कमतरता लक्षात घेऊन, पालिकेने स्वत:च्या मालकीची 50 वाहने चालकांसह नि:शुल्क उपलब्ध करुन दिली आहेत. चुका ठेकेदाराच्या असताना, महापालिका प्रशासन त्याला पाठीशी घालत, आपल्या मालकीची वाहने नि:शुल्क उपलब्ध करुन देत असल्याबद्दल महापालिका वर्तुळात महापालिकेच्या दातृत्वाची चर्चा चांगलीच रंगली आहे.