आठ दिवसांत दुसऱ्या घटनेमुळे शिरूर तालुका हादरला : राजकीय वर्तुळात खळबळ
शिक्रापूर- जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांच्यावर आठ दिवसांपूर्वी शिरूर येथे अपंग महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. आता पुन्हा आठ दिवसांतच शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असल्यामुळे शिरूर तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) पोलीस स्टेशन येथे दाखल झालेल्या गुन्ह्याच्या माहितीनुसार, मलठण येथील किशोर देशमुख यांनी आपल्या 21 गुंठे जमिनीच्या विक्रीमध्ये आपली मंगलदास बांदल व श्रीकांत ज्ञानोबा विरोळे, राहुल वसंत टाकळकर यांच्याकडून फसवणूक झाल्याची तक्रार शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे नोंदवली आहे.
शिक्रापूर पोलिसांनी मंगलदास विठ्ठलराव बांदल, श्रीकांत ज्ञानोबा विरोळे (दोघे रा. शिक्रापूर, ता. शिरूर), राहुल वसंत टाकळकर (रा. हिवरे, ता. शिरूर) यांच्यावर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे करीत आहेत.