पिंपरी – “युनिट नेटवर्किंग मार्केटिंग’ या कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगून एका तरुणाला सहा जणांच्या टोळीने 2 लाख 35 हजार रुपयाला गंडा घातला. ही घटना एक वर्षापूर्वी हिंजवडी येथे घडली. याप्रकरणी अमोल विजय तिरपुडे (वय 27, रा. सुसगाव) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सुशील पाटील, सुरेश दुबे, पार्थ, स्वाती, पियुश सुरेश दुबे आणि कुनाल कुमार मनोहर नखाते (वय 27) या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक वर्षापूर्वी आरोपींनी अमोल याला युनिट नेटवर्किंग मार्केटिंग या कंपनीत 2 लाख 35 हजारांची रक्कम गुंतवणुक करण्यास सांगितले होते. यावर विश्वास ठेवत अमोल यांनी कंपनीत गुंतवणूक केली. मात्र रक्कम गुंतवल्यानंतर एक वर्ष होऊन गेले तरी आरोपींनी अमोल याला कुठल्याही प्रकारचा मोबदला दिला नाही. यामुळे अमोलने आरोपींकडे पैशांसाठी तगादा लावला. यावर आरोपींनी त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी पियूष आणि कुनाल या दोघांना अटक केली आहे.