फ्रेम्स आणि पेण्टिंग्ज

फ्रेम्स आणि पेण्टिंग्जचा वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग करून घराला फ्रेश लुक देणं शक्‍य असतं, पण त्यासाठी करायला हवा जरासा हटके विचार! तो नेमका करायचा कसा, याविषयीच्या काही साध्या सहजसोप्या टिप्स.

आपल्या घरातील एखादी विशिष्ट भिंत सजवण्याची अगदी प्रसिद्ध पद्धती म्हणजे सारख्याच अथवा निरनिराळ्या फ्रेम्समधले कौटुंबिक फोटो लांबच्या लांब अशा भिंतीवर कोलाज करून लावणे. यासाठी जिन्याची भिंतही उत्कृष्ट समजली जाते.

चांगल्या रचनेसाठी सर्वप्रथम या फोटोफ्रेम्स आधी जमिनीवर मांडून त्यांच्या जागा निश्‍चित करून घ्याव्यात. हा अगदी जुना प्रकार असूनही आजही स्टाईलीश समजला जातो. दुसरीकडे असंही होतं की काहीवेळा घरातल्या पेंटिंग्जची नुसती अदलाबदल केली तरी मजा येते. घरातील सर्व पेंटिंग्जच्या जागा बदलून टाका. जागा बदलल्याने तुम्हालाही जुनीच पेंटिंग्ज नव्यासारखी भासू लागतील.

पूर्वी वापरलेले काही मोल्डिंग्ज्‌, फ्रेम्स अशा अडगळीत पडलेल्या वस्तूही होम डेकॉरमध्ये कायापालट करून टाकू शकतात. फक्त या मोल्डिंग्जना योग्य तो रंग देऊन किंवा सर्वात खात्रीचा म्हणजे पांढरा रंग देऊन भिंतीवर ग्रिड पॅटर्नमध्ये लावता येतात. एखादी जुनी पुराणी आकाराने थोडी मोठी अशी लाकडाची फ्रेम अगदीच नाममात्र भावात मिळाली अथवा कोणा मित्राकडे स्टोअरमध्ये धूळखात पडलेली असल्यास ती व्यवस्थित पॉलिश करून घेऊन अथवा हव्या त्या रंगात रंगवून शू-रॅकच्या वर अथवा अर्ध्या स्टोरेजच्या वर भिंतीवर लावता येते. किंवा फक्त स्टोरेजवर ठेवून देता येते. यामुळे आपोआप अँटिक स्टाईल आणता येते. यामध्ये तुम्ही एखादे पेंटिंग लावू शकता अथवा फक्त रिकामी फ्रेम आर्टवर्क म्हणूनही ठेवू शकता. फक्त अशी फ्रेम पुरेशी आकर्षक म्हणजे वूड कार्व्हिंग किंवा रॉट आयर्नच्या डिझाइनची असल्यास उत्तम!

घरामध्ये सर्वत्र आपले किंवा परिवारातील इतर सदस्यांचे फोटो लावणे टाळावे. आपल्या फोटोजमधून आपण आपल्या परिवारासोबत घालविलेल्या सुखद क्षणांच्या आठवणी आपण जपत असतो हे जरी खरे असले, तरी घरामध्ये जिथे तिथे हेच फोटोज्‌ ठेवणे टाळावे. त्याऐवजी घरातील एखाद्या भिंतीवर काळजीपूर्वक निवड केलेल्या फोटोचा कोलाज करणे ही एक चांगली कल्पना आहे. किंवा बैठकीच्या खोलीच्या दर्शनी भागामध्ये एखादा सुंदर फोटो ठेवावा. फोटो कोलाज करताना त्यांच्या फ्रेम्स एकसारख्या असाव्यात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)