पुणे: शाळेतून घरी निघालेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्याला न्यायालयाने चार वर्ष सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश ए. एस. भैसारे यांनी हा आदेश दिला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त पंधरा दिवस साधा कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.
जयवंत मारुती भुरुक (वय 23, रा. किरकटवाडी, ता. हवेली) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी 14 वर्षीय पीडित मुलीच्या आईने राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. 8 ऑगस्ट 2016 रोजी पीडित मुलगी शाळा सुटल्यानंतर भोरमधील इंगवली फाटा येथून पायी घरी जात होती. त्यावेळी झाडांमध्ये दबा धरून बसलेल्या जयवंत याने मुलीला पकडले. तिच्याबरोबर अश्लील चाळे केले. तसेच तो तिच्या गालावरही चावला होता. स्वतःचा बचाव करत असताना पीडित मुलीने देखील त्याच्या बोटाचा चावा घेतला.
याबाबत कोणाला सांगितल्यास मारण्याची धमकी आरोपीने मुलीला दिली होती. दुसऱ्या दिवशी त्याला अटक करण्यात आली होती. अतिरिक्त सरकारी वकील वाजेद खान यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले. त्यांनी एकूण पाच साक्षीदार तपासले. तपास अधिकारी आणि पंचांची साक्ष महत्त्वाची ठरली. तर, पीडितेच्या गालावरील चावा हा आरोपीने घेतला होता हे देखील वैद्यकीय पुराव्यातून सिध्द झाले.