12 जणांचा मृत्यू ; 40 जण आडकल्याची भिती
मुंबई- मुंबईतल्या डोंगरी भागात असलेली एक शंभर वर्षे जुनी चार मजली इमारत कोसळून 12 जणांचा मृत्यू झाला असून आणखीन 40 जण अडकल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. सकाळी 11 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेचे वृत्त समजताच या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या.
एनडीआरएफच्या पथकालाही पाचारण करण्यात आले होते. यावेळी दोन लहान मुलांना आणि एका स्त्रीला बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश जास्त असण्याची शक्यता आहे. मदत आणि बचावकार्य सुरु असताना पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. मातीचा ढिगारा उपसण्याचे काम सुरू करण्यात आले असून जखमींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अत्यंत चिंचोळ्या भागात ही इमारत असल्याने मदतकार्यात अडथळा निर्माण होत आहे. त्यातच या ठिकाणी स्थानिकांनी प्रचंड गर्दी केली असून मदतकार्यात अडथळा येत आहे. दरम्यान, ही इमारत म्हाडाची असून ही इमारत पालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीत नव्हती, असे सूत्रांनी सांगितले.
ही घटना घडल्यानंतर महापालिकेने या इमारतीच्या आजूबाजूच्या धोकादायक इमारती रिकाम्या करण्याचं काम सुरू केले आहे. तसेच या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
नरेंद्र मोदींनी व्यक्त केले दुःख
डोंगरीतील इमारत दुर्घटना अत्यंत दु:खद आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसोबत माझ्या सहवेदना आहेत. जखमी झालेले लोक लवकर बरे होतील अशी मला आशा आहे. महाराष्ट्र सरकार, एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासन मदत आणि बचावकार्य करत आहे असे ट्वीट पंतप्रधान मोदींनी केले आहे.