न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी : विषाची किंमत 2 कोटी 28 लाख रुपये
पुणे- बेकायदेशीरपणे तब्बल 2 कोटी 28 लाख 300 रुपयांचे कोब्रा जातीच्या सापाचे एक लीटर विष बाळगणाऱ्या चौघांना गुन्हे शाखेच्या युनिट 2 पथकाने जेरबंद केले आहे. दरम्यान त्यांना एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
हिमांशु तिलक साहू (28, रा. कांकेर, छत्तीसगड), दशरथ निरंजन हलदार (38, रा. रायपूर, छत्तीसगड), विकास मनोहर भैसारे (34, रा. आरमोरी, गडचिरोली), महेंद्र रावसाहेब जाधव (37, अंबड रोड, जालना) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
यापैकी साहु यांचा पोल्ट्री फार्मचा व्यवसाय आहे. हलदार इस्टेट एजंट आहे. भैसारे शेतीकरी असून, जाधव खासगी नोकरी करतो. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक अनिल पांडुरंग ऊसुलकर यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, गुरूवारी सायंकाळी कॅम्प परिसरात चौघे कोब्रा जातीचे विष विक्रीसाठी येणार आहेत. त्यानुसार कॅम्प परिसरात चौघेही आल्यानंतर संशयीतरित्या फिरताना दिसले. त्यानुसार पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले.
त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून कोब्रा सापाचे विष जप्त करण्यात आले. चौघांवर वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.