अकोले – वीरगाव (ता. अकोले) येथील एकाच कुटुंबातील चौघांचा मध्यप्रदेशात झालेल्या कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. वीरगाव येथील भगवान भागवत वाकचौरे (वय 48), त्यांची पत्नी वंदना (वय 45), मुलगी तनुजा (वय 18) आणि पुतण्या संकेत चंद्रकांत वाकचौरे (वय 20) या चौघांचा या अपघातात मृत्यू झाला. त्यांचा मुलगा पियूष भगवान वाकचौरे (वय 15) हा जखमी झाला आहे.
मध्यप्रदेशातील ठिकरी (जि. बडवानी) या पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाटे तीन वाजता मुंबई-आग्रा हायवेवर हा अपघात झाला. वाकचौरे कुटुंबीय जेजुरीच्या खंडोबा दर्शनानंतर मध्यप्रदेशातील धार येथील देवीच्या दर्शनाला निघाले होते. भगवान वाकचौरे हे पेठ सुरगाणा येथे शिक्षणविस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होते. या अपघाताने वीरगावावर शोककळा पसरली आहे.