संगमनेर – संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर शिवारात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात अडीच वर्षांच्या बालकासह चार जण गंभीर जखमी झाले. गुरुवारी (6 मे) सकाळी ही घटना घडली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून धाडसाने पाठलाग करून हल्ला करणाऱ्या बिबट्यास जेरबंद करण्यात यश मिळविले. कौठे कमळेश्वर शिवारात गुरुवारी सकाळी बिबट्याचा धुमाकूळ घातला. बिबट्याच्या हल्ल्यात कृष्णा वाल्मिक गायकवाड (वय अडीच वर्ष), संजय जगन भडांगे (वय 40), वन कर्मचारी एकनाथ खंडू थेटे (वय 55, रा. निमगावजाळी) व संजय बबन भुजबळ (वय 45, रा. निबांळे) असे चौघेजण गंभीर जखमी झाले.
गायकवाड वस्ती येथे सकाळी सातच्या सुमारास कृष्णा हा लहान बालक घराच्या अंगणात खेळत असताना पाठीमागून आलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला. त्याच्या मानेला चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झाला. घरच्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. त्यांनतर जवळच असलेल्या जांभळीचा मळा येथे याच बिबट्याने संजय भडांगे यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या डोक्याला चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले.
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे घाबरलेल्या संजयने मदतीसाठी आरडाओरडा केला. त्याचा आवाज ऐकून आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेताच बिबट्याने पुन्हा धूम ठोकली. घटनेची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविली. त्यानंतर तातडीने घटनास्थळी गेलेल्या एकनाथ थेटे व संजय भुजबळ या दोन वनमजुरांवर बिबट्याने हल्ला केला. जखमी झालेल्या चौघांनाही उपचारासाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी बी. एल. गीते यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अंबादास मेहेत्रे, वनपाल राजेंद्र अल्हाट, वनपाल प्रशांत पुंड, वरक्षक संतोष पारधी, वनकर्मचारी बाबासाहेब दिघे, पी. ए. जोंधळे, ए. आर. गीते, बी. पी. डेंगळे, सतीश पर्बत, दत्तू पर्बत, रामदास वर्पे, मधुकर अरगडे, साहेबराव अरगडे यांनी कौठेकमळेश्वर शिवारात बिबट्याचा पाठलाग सुरु केला. वनरक्षक प्रशांत पुंड यांनी ब्लो पाईप डार्टगनच्या सहायने बिबट्यास भुलीचे इंजेक्शन मारले. त्यामुळे दहा मिनिटात अंदाजे चार वर्ष वयाचा सदर नर जातीचा बिबट्या सूर्यभान भडांगे यांच्या विहिरीत पडला. त्यास वनकर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहायाने विहिरीतून बाहेर काढले व तातडीने वनविभागाच्या निंबाळे रोपवाटिकेत हलविले.