पाण्यातून आले वाहत : नागरी वस्तीत आसऱ्याला
आकुर्डी – दिघीतील सावंतनगर येथे जायंट सॉफ्ट शिल्ड हे दुर्मिळ कासव आढळून आले. त्याला सर्प मित्रांच्या मदतीने वन विभागाच्या तळ्यात सोडण्यात आले आहे.
सावंतनगर येथे राहणारे सखाराम सुर्वे व प्रवीण सुर्वे यांच्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ हे कासव आढळून आले. पावसाच्या पाण्यामुळे जवळच असलेल्या नाल्यातून हे कासव वाहत आले असावे. तसेच नाल्याशेजारी असलेल्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ ते आसऱ्याला आले असावे असा अंदाज सखाराम सुर्वे यांनी वर्तविला.
कासव घरात असल्यास आर्थिक सुबत्ता येते, पैशांचा पाऊस पडतो या अंधश्रध्देतून कासवाचा दुरूपयोग होतो. हे कासव अन्य कोणाच्या हाती लागून त्याचा गैरवापर होवू नये यासाठी सुर्वे यांनी हे कासव सर्प मित्र राजू कदम यांना बोलावून त्यांच्या स्वाधीन केले. मृदू कवच (सॉफ्ट शिल्ड) असलेले गोड्या पाण्यातील हे कासव असल्याची माहिती राजू कदम यांनी दिली.
पुणे वन विभाग भांबुर्डा येते वन अधिकाऱ्यांकडे हे कासव सोपविण्यात आले. तेथे त्याला वन विभागाच्या तळ्यात सोडण्यात आले. यावेळी सर्प मित्र विनायक बडदे, राजू कदम, गजानन मेटकरी, बाबा त्रिभूवन आदी उपस्थित होते.