गुलमोहर रोडवरील घटना : चोरट्याविरुद्ध गुन्हा
नगर – माजी नगरसेविका संगीता खरमाळे या घराच्या गेटवर जात असताना भरधाव वेगातील दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून नेले. गुलमोहर रोडवरील गुलमोहर पार्क येथे सोमवारी (दि.3) रात्री पावणेआठ वाजता ही घटना घडली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, संगीता रत्नाकर खरमाळे या त्यांच्या घरी जात असताना घराच्या गेटजवळ आल्या. त्यावेळी भरधाव वेगातील दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी पाठीमागील बाजूस बसलेल्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून घेतले. त्यानंतर दुचाकीचा वेग वाढून दोघेही पसार झाले. या घटनेनंतर खरमाळे यांनी आरडाओरड केली. परंतु कोणी मदतीला येण्यापूर्वीच अंधाराचा फायदा घेऊन चोरटे पसार झाले. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात संगीता खरमाळे यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.