दुसऱ्याच्या नावे असलेली जमीन विकून लाखोंची फसवणूक
पिंपरी – दुसऱ्याच्या नावची जमीन विकून डॉक्टरची तब्बल 22 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे यांच्यासह अंगत नारायण चव्हाण, अमित मनानी, अशोक बागलाणी, प्रदीप वाघमारे, अनूप सिंग, स्वप्निल काटे, भीवा दास, माणिक रसाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी डॉ. महेश शिवाजी पांढरपट्टे (वय-33 रा.ताम्हाणे वस्ती, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुुसार, फिर्यादी यांना आरोपींनी चिखली येथील गट क्रमांक 383 येथील जमीन दाखवून त्या जमिनीची विक्री केली. जमिनीचे खरेदीखतही झाले, मात्र नंतर डॉ. पांढरपट्टे यांना ती जमीन दुसऱ्याच्याच नावावर असल्याचे कळाले. ही जमीन “वेदांत’ या विकसकाकडे असल्याने आरोपींनी जमीन विकासासाठी दिल्याचे “वेदांत’ यांनी फिर्यादी यांना सांगितले होते. त्यानुसार पांढरपट्टे यांनी चौकशी केली असता तुम्हाला दुसरी जागा देतो, मात्र त्यासाठी आणखी थोडी रक्कम द्यावी लागेल असे सांगण्यात आले. त्यानंतर फिर्यादीकडून 22 लाख 50 हजार रुपये घेतले. हा व्यवहार 19 मे 2015 ते 20 एप्रिल 2019 च्या कालावधीत झाला आहे. मात्र अद्याप फिर्यादी यांना जमीन किंवा रक्कम परत दिली नाही. आपली फसवणूक झाल्याचे हे लक्षात येताच त्यांनी चिखली पोलीसांत नऊ जणांवरोधात तक्रार दिली.