ढाका – बांगलादेशचे माजी लष्करी हुकुमशहा हुसैन मुहम्मद इर्शाद यांचे आज ढाका येथे वृद्धापकाळामुळे निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी रौशन इर्शाद, द्वितीय पत्नीपासून झ्लेला एक मुलगा आणि 2 दत्तक मुले आहेत. इर्शाद हे जातीय पार्टीचे अध्यक्ष आणि संसदेतेतील विरोधी पक्ष नेतेही होते. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना 22 जून रोजी “कमबाईन्ड मिलीटरी हॉस्पिटल’मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना कृत्रिम जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. एकापाठोपाठ एक अवयव निकामी होत गेल्याने आज सकाळी 7.45 वाजता त्यांचे निधन झाले, असे जनसंपर्क विभागने सांगितले.
बांगलादेशचे अध्यक्ष अब्दुल हमिद, पंतप्रधान शेख हसिना आणि संसदेतील सभापती डॉ. शिरीन शर्मिन चौधरी यांनी इर्शाद यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. मंगळवरी रंगापूर जिल्ह्यात त्यांच्या मूळ गावी त्यांचे पार्थिव नेण्यात येईल. त्यच् दिवशी ढाक्यातील बनानी लष्करी दफनभूमीत दफनविधी केले जातील.
1982 साली रक्तपात विरहीत क्रांतीनंतर इर्शाद यांनी देशाची सत्ता ताब्यात घेतली होती. त्यानंतर 8 वर्षे ते बांग्लादेशचे अध्यक्ष राहिले. 1990 साली लोकशाही चळवळीमुळे त्यांना पदावरून पायउतार व्हायला लागले होते. विविध आरोपांमुळे त्यांना काही काळ तुरुंगातही रहायला लागले होते. संसदेत ते काही वेळेस निवडून गेले. त्यातील एक निवड्णूक तर त्यांनी तुरुंगातूनच लढवली होती. धर्मनिरपेक्ष बांगलादेशला इस्लामी देश म्हणून घोषित करण्याचा त्यांचा निर्णय खूप वादग्रस्त ठरला होता.