नवी दिल्ली – परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतातील विविध बाजारात 7,095 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. गेल्या चार महिन्यांपासून हे गुंतवणूकदार भारतात विक्रीपेक्षा खरेदी जास्त करीत आहेत. मे महिन्यात या गुंतवणूकदारांनी 9,031 कोटी रुपयाची, एप्रिल महिन्यात 16,093 कोटी रुपयांची तर मार्च महिन्यात 45,981 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. फेब्रुवारी महिन्यात या गुंतवणूकदारांनी 11,182 कोटी रुपयांची गुंतवणूक केली.
डिपॉझिटरीनी दिलेल्या माहितीनुसार 3 ते 7 जून या काळात या गुंतवणूकदारांनी शेअरबाजारात 1,915 कोटी रुपयांची तर रोखे बाजारात 5,180 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. या आठवड्यात गुंतवणूकदारांनी प्रत्येक दिवशी विक्रीपेक्षा खरेदी जास्त केल्याचे दिसून येते. नवे स्थिर केंद्र सरकार चांगला अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता असल्यामुळे हे गुंतवणूकदार भारतीय बाजारपेठेबाबत आशावादी झाले असल्याचे दिसून येते.