स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पोहचली घाटेवाडीत लालपरी

ग्रामस्थांकडून पूजन करून उत्साहाने स्वागत

ठोसेघर – पाटण तालुक्‍यातील अतिदुर्गम भागातील घाटेवाडी गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सर्वसामान्यांनाची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेली एसटी सेवा सुरू करण्यात आली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून घाटेवाडी ग्रामस्थांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर घाटेवाडी-कराड आणि घाटेवाडी- पाटण एसटी सेवा सुरू झाली आहे. पहिल्यांदाच गावात आलेल्या लालपरीचे घाटेवाडी ग्रामस्थांकडून मोठ्या उत्साहाने पूजन करून स्वागत करण्यात आले.
घाटेवाडी हे पाटण तालुक्‍यातील सातारा पाटण तालुक्‍याच्या सीमेवरील अतिदुर्गम गाव आहे.

गावाची लोकसंख्या जवळपास सातशेपेक्षा जास्त असताना देखील स्वातंत्र्यानंतर सात दशकांचा कालावधी उलटूनही आजपर्यंत या गावांपर्यंत दळणवळणाची सोयच नव्हती. त्यामुळे गावातील ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत होता. विद्यार्थ्यांना दररोज मुरूड येथील शाळेत ये-जा करण्यासाठी तब्बल अकरा किलोमीटर डोंगर दऱ्यातून पायपीट करावी लागत होती. तर वयोवृद्ध आणि आजारी रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत होते.

गेल्या कित्येक वर्षांपासून पाठपुरावा करून घाटेवाडी ते कराड आणि पाटणपर्यंत एसटी सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांची होणारी दळणवळणाची गैरसोय काही प्रमाणात दूर होणार आहे. घाटेवाडीसह या एसटी सेवेचा फायदा पारडेकरवाडी, डोणी, मालोशी या गावांतील ग्रामस्थांनादेखील होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान, घाटेवाडीत पहिल्यांदाच आलेल्या सर्व सामान्यांच्या रथाचे घाटेवाडी ग्रामस्थांकडून पूजन करून स्वागत करण्यात आले. तर एसटीचे चालक आणि वाहक यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी घाटेवाडीमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here