भिकाऱ्यांसाठी तरुणाचे “स्टार्टअप”

जगदीश काळे

गणपत कृष्णा यादवचे मित्र आज अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया, बंगळूर आणि पुण्यासारख्या शहरात बहुराष्ट्रीय कंपन्यांत चांगल्या पॅकेजवर काम करत आहेत. मात्र, त्याने आपले स्वप्न साकार करण्यासाठी वेगळ्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला. त्यातून दोन हेतू साधले गेले. एक म्हणजे सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन आणि दुसरे म्हणजे भिकाऱ्यांना रोजगार!

राजस्थानच्या या युवकाने अनोख्या पद्धतीचा विचार करत स्टार्टअप सुरू केले. या प्रकल्पाचे अनोखेपण म्हणजे त्यामध्ये केवळ भिक मागून गुजराण करणाऱ्या लोकांना नोकरी दिली जाते. विशेष म्हणजे या प्रकल्पाची कल्पना राजस्थान सरकारलाही देण्यात आली होती; परंतु सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने त्याने स्वत:च्या हिमतीवर प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला. नवीन विचार आणि अनोख्या संकल्पनेवर काम करणारे गणपत यादव हे सिकर जिल्ह्यातील श्रीमाधोपूर विभागातील मंडरू गावातील रहिवासी होत. गणपतने जैविक शेती सुरू केली. त्यासाठी त्याने जयपूरच्या चौमूंजवळ खेजरोली आणि सिंगोद गावात दोन जमीन भाडेतत्त्वावर घेतल्या. या ठिकाणी काम करण्यासाठी त्याने केवळ रस्त्यावर भीक मागण्यास प्रवृत्त झालेल्या लोकांनाच संधी दिली.

गणपतच्या मते, या वर्गातील लोकांना केवळ जोडणे एवढेच नाही तर त्यांचा सर्व प्रकारचा खर्च भागवला जाणार आहे. नोकरी देऊन त्यांच्या खाण्याची, राहण्याची सोय करण्याबरोबरच सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देण्याबाबत खर्चाची जबाबदारी उचलली आहे. त्याचबरोबर येथे काम करणाऱ्या मुलांच्या शिक्षणाचीही जबाबदारी स्वीकारली असून त्यासाठी एक कायदेशीर शिक्षण संस्थेची नोंदणी करण्यात आली आहे.

हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी गणपत केवळ भिकाऱ्यांना नोकरी देत आहे. यासाठी त्याने सोशल मीडियाचाही आधार घेतला आहे. या माध्यमातून मित्र, नातेवाईकांना रस्त्यावरील भिकाऱ्यांना संपर्क साधण्याचे आवाहन केले जात असून त्यांना नोकरी देण्याचा विश्‍वास त्यांच्या मनात निर्माण केला जात आहे. गणपतच्या मते, सेंद्रिय शेतीतून चांगले उत्पन्न मिळते. हे लक्षात घेऊन या प्रकल्पात व्यवसायिकांना सहभागी करून घेण्याऐवजी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या वर्गांना सहभागी करून घेण्याचा विचार करण्यात आला.

गणपतने जयपूरच्या एमएनआयटी कॉलेजमधून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्याला लहानपणापासूनच रस्त्यावर भीक मागणाऱ्या लोकांसाठी काहीतरी करावे, असे वाटत होते. त्यांची आर्थिक पत सुधारावी, त्यांना काम मिळावे, यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत जेणेकरून ते स्वत:च्या पायावर उभे राहतील, असे गणपतला मनोमन वाटत होते. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गणपतला खासगी कंपनीत लाखो रुपयाचे पॅकेज मिळाले. काही वर्ष त्याने नोकरीही केली; परंतु त्याचे स्वप्नही पूर्ण झाले नाही. त्यामुळे गणपतने नोकरी सोडली आणि अनोख्या पद्धतीचे स्टार्टअप सुरू करण्याचा पक्का निर्धार केला.

गणपतने या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे शंभर भिकाऱ्यांना नोकरी देण्याचे ध्येय निश्‍चित केलेले आहे. तो म्हणतो की, आपल्याबरोबर शिकलेले मित्र आज देश-विदेशात मोठ्या पदावर काम करत आहेत आणि वेतनही लाखाच्या घरात आहे; परंतु मी आपले स्वप्न साकार करण्यासाठी वेगळा रस्ता निवडला. गणपत यांच्या सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिले जात असून सध्या बाजरी, भाजीपाला, शेंगा याचे उत्पादन घेतले जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)