गोवा-बेंगळुरू यांच्यात आघाडीसाठी झुंज

गोवा: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) गुरुवारी येथील नेहरू स्टेडियमवर एफसी गोवा आणि गतउपविजेता बेंगळुरू एफसी यांच्यात लढत होत आहे. गुणतक्त्‌यातील आघाडीसाठी ही लढत महत्त्वाची असेल.एफसी गोवा सात सामन्यांतून 16 गुणांसह आघाडीवर आहेत. जिंकल्यास त्यांची आघाडी आणखी भक्कम होईल. त्याचवेळी एफसी गोवा संघाला हरविल्यास बेंगळुरू एफसीला आघाडी मिळू शकेल. बेंगळुरूचे पाच सामन्यांतून 13 गुण आहेत.

या लढतीत दोन आक्रमक जोड्या आमनेसामने येतील. गोव्याचे फेरॅन कोरोमीनास-एदू बेदिया विरुद्ध बेंगळुरूचे मिकू-सुनील छेत्री असा मुकाबला रंगेल. बेदिया आणि ह्युगो बौमौस यांच्या रुपाने गोव्याकडे दोन सर्वाधिक कल्पक खेळाडू आहेत. चिवट बचाव भेदण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे मिळालेल्या संधीचे फिनिशिंगद्वारे गोलमध्ये रुपांतर करणारा खेळाडू कोरोच्या रुपाने आहे. त्याचे हे कौशल्य उत्तम आहे.

गोव्याचे प्रशिक्षक सर्जिओ लॉबेरा यांनी सांगितले की, आम्ही लिगमधील सर्वोत्तम संघाला सामोरे जात आहोत. ही लढत मोठे आव्हान असेल. या लिगमध्ये काय घडणार हे या लढतीतून ठरेल. आम्हाला घरच्या मैदानावर तीन गुण जिंकण्याची चांगली संधी आहे आणि त्याचा फायदा उठवावा लागेल.

बेंगळुरूसाठी छेत्री तंदुरुस्त होणे फार चांगली बातमी आहे. दुखापतीमुळे त्याला आंतरराष्ट्रीय लढतीस मुकावे लागले होते. छेत्रीने चार गोल केले आहेत, पण मिकूवरही सर्वांचे लक्ष असेल. व्हेनेझुएलाचा हा स्ट्रायकर सर्वोत्तम फॉर्मात आहे. बेंगळुरूला केवळ जमशेदपूर एफसीविरुद्ध गुण मिळाले नाहीत. त्या लढतीत मिकू गोल तसेच ऍसिस्ट यापैकी काहीही करू शकला नाही.

बेंगळुरूचे प्रशिक्षक कार्लेस कुआद्रात यांनी सांगितले की, सुनीलने गेल्या दोन सराव सत्रांत भाग घेतला. आमच्यादृष्टिने तो तंदुरुस्त आहे. तो उद्या खेळू शकतो. आयएसएलमधील सर्वाधिक गोलांच्या क्रमवारीत छेत्री आणि कोरो हे दोघे इयन ह्यूम याच्या उच्चांकाजनिक जात आहेत. ह्युमचे 28 गोल आहेत. कोरोचे 26, तर छेत्रीचे 25 आहेत.

कुआद्रात यांनी सांगितले की, एफसी गोवा चांगला फुटबॉल खेळत आहेत. ते बरेच गोल करीत आहेत. त्यामुळे हा सामना चांगला होईल. याचे कारण आमचा दृष्टिकोन सुद्धा चांगला खेळ करण्याचा आणि गोल नोंदविण्याचा असतो. ही लढत सर्व चाहत्यांसाठी पर्वणी ठरेल अशी आशा आहे.

बेंगळुरू हा स्पर्धेत अपराजित असलेल्या दोन संघांपैकी एक आहे. त्यांचा हा मोसमातील चौथा अवे सामना असेल. त्यांनी आधीच्या तिन्ही लढती जिंकल्या आहेत आणि हा महत्त्वाचा मुद्दा आहे. लॉबेरा यांनी लीगमधील सर्वोत्तम संघ अशी गणना केली.यापूर्वी हे दोन संघ गोव्यात आमनेसामने आले तेव्हा सात गोलांचा थरार झाला. त्यात यजमान गोव्याची सरशी झाली होती. गोव्याला पुन्हा विजयाची पर्वणी मिळणार का की बेंगळुरू अपराजित घोडदौड राखणार याची उत्सुकता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)