दोनदा पिछाडीवर पडूनही गोव्याचा दिल्लीवर विजय

इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धा

गोवा – हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) पाचव्या मोसमात एफसी गोवा संघाने गुरुवारी दिल्ली डायनॅमोजचे चिवट आव्हान 3-2 असे परतावून लावले. दोन वेळा पिछाडीवर पडूनही गोव्याने आघाडी घेत सामन्यात बाजी मारली. याबरोबरच गोव्याने गुणतक्त्‌यात तीसऱ्या क्रमांक वर झेप घेतली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दिल्लीने बिक्रमजीत सिंगच्या गोलमुळे सहाव्याच मिनिटाला खाते उघडले होते. मध्यंतरास दिल्लीकडे आघाडी होती, पण बेदीयाने 54 व्या मिनिटाला बरोबरी साधून दिली. लालियनझुला छांगटेने दिल्लीला पुन्हा आघाडी मिळवून दिली. मग ब्रॅंडन फर्नांडीसच्या गोलमुळे गोव्याने आठ मिनीटे बाकी असताना बरोबरी साधली होती. बेदियाने निर्धारीत वेळ संपण्यास एकच मिनिट बाकी असताना केलेला गोल सामन्यात निर्णायक ठरला. या विजयानंतर फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर 17 हजार 495 प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.

गोव्याने घरच्या मैदानावरील आधीच्या सामन्यात पुणे सिटीचा 4-2 असा पराभव केला होता. त्या सामन्यात फेरॅन कोरोमीनास याला लाल कार्डला सामोरे जावे लागले होते. परिणामी तो जमशेदपूर एफसीविरुद्धच्या लढतीला मुकला होता. त्यात 1-4 असे गारद झाल्यामुळे गोव्याची अपराजित मालिका संपुष्टात आली होती.

दिल्लीने सुरवात सनसनाटी केली. सहाव्याच मिनिटाला खाते उघडताना बिक्रमजीतने नेत्रदिपक गोल केला. मार्कोस टेबारने ही चाल रचताना मध्य क्षेत्रात ऍड्रीया कॅर्मोना याला पास दिला. बाजूला दोन प्रतिस्पर्धी असूनही ऍड्रीयाने डावीकडे बिक्रमजीतच्या दिशेने चेंडू मारला. बिक्रमजीतने उजव्या पायाने चेंडूवर ताबा मिळवित नेटच्या दिशेने ताकदवान किक मारली.

गोव्याचा गोलरक्षक महंमद नवाझ झेप टाकूनही चेंडू अडवू शकला नाही. या गोलनंतर बिक्रमजीतने एकच जल्लोष केला. गोव्याने दुसऱ्या सत्रात 54व्या मिनिटाला बरोबरी साधली. मध्य क्षेत्रात कोरोने चेंडूवर ताबा मिळविला. त्याने डावीकडून मंदार राव देसाई याला पास दिला. मंदारने बॉक्‍सच्या मध्यभागी दिलेल्या चेंडूवर अप्रतिम फटका मारत दिल्लीचा गोलरक्षक फ्रान्सिस्को डोरोन्सोरो याला चकविले.

दिल्लीने 70व्या मिनिटाला आघाडी घेतली. रेने मिहेलीच याने नंदकुमार शेखरला अप्रतिम क्रॉस पास दिला. शेखरने पहिल्या प्रयत्नात जास्त ताकद लागूनही चेंडूवर ताबा मिळविला आणि टाचेने छांगटेला पास दिला. छांगटे तेव्हा केवळ सहा यार्डावर होता आणि त्याला मार्किंग नव्हते. याचा छांगटने फायदा उठविला. गोव्याने दुसऱ्यांदा पिछाडीवर पडल्यानंतरही प्रयत्न सुरु ठेवले. आठ मिनिटे बाकी असताना मंदारच्या पासवर ब्रॅंडनने लक्ष्य साधले. मग एक मिनिट बाकी असताना ह्युगो बौमौस याच्या पासवर बेदियाने हेडिंगवर गोल केला.

पहिला प्रयत्न गोव्याने दुसऱ्याच मिनिटाला केला होता. जॅकीचंद सिंगने उजवीकडून कोरोला पास दिला. कोरोने क्रॉस शॉट मरला, पण दिल्लीचा बचावपटू प्रीतम कोटलने चेंडू बाहेर घालविला. त्यामुळे पुन्हा मिळालेल्या कॉर्नरवर काही उल्लेखनीय घडले नाही. तिसऱ्या मिनिटाला दिल्लीच्या नंदकुमार शेखर याने उजवीकडून नेटसमोर क्रॉस शॉट मारला, पण त्याचा कोणताही सहकारी हेडिंग करण्यासाठी योग्य स्थितीत नव्हता. नवव्या मिनिटाला एदू बेदीयाच्या पासवर अहमद जाहौह याने सुमारे 25 यार्डावरून मारलेला चेंडू डोरोन्सोरो याने अडविला. पुढच्याच मिनिटाला जॅकीचंदच्या पासवर कोरोने मारलेला चेंडू डोरोन्सोरोने बाजूचा अंदाज काहीसा चुकूनही पटकन सावरत झेपावत बाहेर घालविला. पूर्वार्धात गोव्याला चालींचे फिनीशिंग करता येत नव्हते. उत्तरार्धात त्यांनी यात सुधारणा केली.

सहा सामन्यांत गोव्याने चौथा विजय मिळविला असून एक बरोबरी, एक पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 13 गुण झाले. बेंगळुरू एफसीचे पाच सामन्यांतून 13 गुण आहेत. गोव्याचा गोलफरक 7 (18-11) हा बेंगळुरूच्या 6 (10-4) गोलफरकापेक्षा सरस आहे. त्यामुळे गोव्याला आघाडी मिळाली. जमशेदपूर व नॉर्थइस्ट युनायटेड एफसी प्रत्येकी 11 गुणांसह अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानावर आहेत. दिल्लीसाठी हा निकाल निराशाजनक ठरला. आठ सामने होऊनही त्यांची विजयाची प्रतिक्षा कायम आहे. दिल्लीला चौथा पराभव पत्करावा लागला. चार बरोबरींच्या चार गुणांसह दिल्ली नवव्यास्थानी कायम आहे.

निकाल :
एफसी गोवा : 3 (एदू बेदिया 54, 89, ब्रॅंडन फर्नांडीस 82) विजयी विरुद्ध
दिल्ली डायनॅमोज एफसी : 2 (बिक्रमजीत सिंग 6, लालियनझुला छांगटे 70)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)