विकासकामांसाठी पाठपुरावा महत्त्वाचा : डॉ. येळगावकर

जलसंधारणाला प्राधान्य; कान्हरवाडी येथे 1 कोटी 86 लाखांच्या पाझर तलावाचे भूमिपूजन

मायणी – केंद्र व राज्यातील शासन जनतेच्या भल्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देत आहे. हा निधी पदरात पाडून घेण्यासाठी प्रशासन पातळीवर मोठा संघर्ष करावा लागत आहे. आपला गाव परिसर व भागामध्ये चांगला विकासनिधी आणण्यासाठी गाव पातळीवरील कार्यकर्ते व जबाबदार पदाधिकाऱ्यांचा पाठपुरावा अत्यंत महत्त्वाचा आहे, असे ठोस प्रतिपादन माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी केले.

कान्हरवाडी (ता. खटाव) येथे शासनाच्या जलसंधारण विभागामार्फत मंजूर झालेल्या 1 कोटी 86 लाख रुपये खर्चाच्या पाझर तलावाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते बापुराव पाटील, युवा नेते अतुल यलमर, सरपंच अमोल यलमर, डॉ. दीपक यलमर, मधुकर पाटील, भगवान साळुंखे, जालिंदर साळुंखे, सुनील यलमर, दत्ता पाटील, दत्तात्रय यलमर, सुहास यलमर, मंगेश यलमर, चंद्रकांत यलमर, शंकरआबा पाटील, अभियंता श्री. पवार, अतुल शिंदे यांची उपस्थिती होती.

डॉ. येळगावकर म्हणाले, रस्ते व जलसंधारणाच्या कामास सध्याच्या शासनाने प्राधान्य दिले आहे. खटाव-माण तालुक्‍यातही रस्ते, बंधारे, छोटे-मोठे पाझर तलाव तसेच जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर झाली आहेत. कान्हरवाडी येथील तलावासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्याचबरोबर औंध भागातील नांदोशी, खबालवाडी या दोन ठिकाणी प्रत्येकी 50 लाख रुपयांचे तलाव मंजूर करण्यात आपणास यश आले आहे. ही कामे मार्गी लावण्यासाठी जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. गावचे सुपुत्र अतुल यलमर यांनीही या कामासाठी चिवटपणे पाठपुरावा केल्याचे यावेळी डॉ. येळगावकरांनी भाषणात नमूद केले. एस. पी. यलमर यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)