परदेशांत नियम पाळतात; मग आपल्या देशातच का नाही?

नागरिकांनी मानसिकता बदलत नियमांचे पालन करणे आवश्‍यकच

– कल्याणी फडके

पुणे – “हेल्मेट नाही म्हणून पोलिसांनी पकडले आणि 500 रुपये दंड केला.’ “पीयूसी नाही म्हणून दंड केला,’ “ट्रीपल सीट निघालो म्हणून दंड केला,’ “झेब्रा क्रॉसिंगर फक्त कडेला उभा होतो, तरीही दंड केला,’ “लाल सिग्नल लागायचा होता, पिवळा होता. तरी पोलिसांनी पकडून दंड केला.’ “थोड्याच अंतरावर जायचे होते म्हणून एकेरी वाहतुकीचे नियम मोडले,’ “लवकर जायचे होते म्हणून नो एन्ट्रीत घुसलो होतो,’ “यांना पैसेच हवेत, टपून बसलेले असतात’ अशी एक ना अनेक दूषणे देत वाहतूक पोलिसांनाही टार्गेट केले जात आहे. हेच नियम परदेशातही आहेत, मात्र तेथे एवढे दंड आहेत, की जे ऐकून डोळे पांढरे होतील. तेथे गेल्यानंतर आपसूकच हे नियम पाळले जातात. मग आपल्या देशात का नाही, असा प्रश्‍न पोलिसांकडून विचारला जातो.

उगाच दंड करायचा म्हणून नव्हे, तर काहीतरी चूक केलेली असते, यासाठीच हा दंड आकारला जातो. त्यासाठी एवढी दूषणे का द्यावीत, जर आपणच वाहतुकीचे नियम पाळले तर आम्हांला दंड करण्याची वेळ येणार नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे पकडले गेल्यानंतर त्यावर बोलण्यापेक्षा किंवा दुसऱ्यांकडे बोट दाखवण्यापेक्षा आपण ते नियम पाळतो का याचा प्रत्येक नागरिकाने विचार करायला हवा. याबाबत वाहतूक उपायुक्त पंकज देशमुख यांच्याशी संवाद साधला असता, “नागरिकांनी स्वयंशिस्तीने वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्‍यक आहे,’ असे मत त्यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना व्यक्त केले.

“शहरातील नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे. वाहनचालकांनी नियमांचे स्वयंशिस्तीने पालन केल्यास वाहतूक पोलीसांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्याची वेळ येणार नाही. यासाठी नागरिकांनी मानसिकता बदलत नियमांचे पालन करणे आवश्‍यक आहे,’ असे देशमुख म्हणाले.

आणि आपले पुणे…
पुण्याबाहेरील शहरांची परिस्थिती बरी आहे.. अन्य शहरांमध्ये वाहतूक कोंडीचा त्रास नाही.. रस्त्यांवर “हॉर्न’चा कर्कश्‍श आवाज नाही.. पुण्यासारखी “प्रचंड’ वाहने देखील नाहीत..अशी एक ना अनेक वाक्‍ये पुणेकरांच्या तोंडून पुण्याबाबत ऐकायला मिळतात. मुंबई, नागपूर, नाशिक अशा विस्तारणाऱ्या शहरांमध्ये प्रवास करुन आलेल्या पुणेकरांकडून हमखास अन्य शहरांची पुण्याशी तुलना करण्यात येते. या तुलनेतून पुण्यासारख्या “विस्तीर्ण’ शहरामध्ये वाहतूक यंत्रणा “फेल’ झाली असल्याचे निष्कर्ष लावण्यात येतात. हे निष्कर्ष योग्य असतील, तरी मात्र शहरातील पायाभूत सुविधा, सार्वजनिक वाहतुकीची परिस्थिती आणि शिस्त पाहता शहरातील वाहतुकीचे “तीन तेरा’ वाजले असल्याचे नागरिक सांगतात.

याबाबत वाहतूक उपायुक्त देशमुख म्हणाले, “पुणे शहराच्या वाहतुकीची तुलना कायम अन्य शहरांबरोबर केली जाते, केवळ शहरातच नव्हे शहराच्या आजूबाजूला शहरीकरण प्रचंड मोठ्या प्रमाणावर झाले आहे. वाहनांची संख्या देखील अधिक आहे. नागरिकांचे वागण्याचे अनेक प्रकार या शहरात आहेत. त्यामुळे अन्य शहरांशी पुण्याची तुलना होऊ शकत नाही.’

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here