फोल्डेबल स्मार्टफोन्स

21व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच मोबाईल विश्‍वामध्ये मोठी क्रांती येण्यास सुरुवात झाली होती. केवळ चैनीची वस्तू ते रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक असा मोबाईलचा प्रवास थक्‍क करणारा आहे. सुरुवातीच्या काळात केवळ कॉलिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या मोबाईलमध्ये मल्टिमीडियाचा समावेश झाल्यानंतर या साध्यासुध्या मोबाईलचे स्मार्टफोन मध्ये रूपांतर झाले. आज-काल तर स्मार्टफोन जगभरामधील तरुणाईच्या गळ्यातील ताईतच बनला आहे. दिवसागणिक बदलत जाणारी टेक्‍नॉलॉजी, स्मार्टफोनचे नवनवीन लुक्‍स यावर तरुणाई मोठ्या प्रमाणात भाळताना दिसत असून त्यामुळे स्मार्टफोनची मागणी जगभरामध्ये वाढतानाच दिसत आहे.

गेल्या दोन वर्षांमध्ये जगभरातील स्मार्टफोन्सच्या लूकमध्ये एक मोठा बदल झाल्याचे आपण पाहिले आहे. स्मार्टफोनमधील डिस्प्लेच्या वरच्या आणि खालच्या बाजूस असणारी निरुपयोगी जागा किंवा किनार ज्याला टेक्‍निकल भाषेत बेझल्स म्हटले जाते ती स्मार्टफोन कंपन्यांकडून हळूहळू कमी केली गेली आहे. स्मार्टफोनच्या समोरच्या बाजूस जास्तीत जास्त डिस्प्ले असावा या दृष्टिकोनातून केली गेलेली ही रचना जगभरामधील स्मार्टफोन प्रेमींच्या भलतीच पसंतीस पडली त्यातूनच फुल व्ह्यु डिस्प्ले, बेझाललेस डिस्प्ले असणारे स्मार्टफोन्स बाजारपेठेत येऊ लागले. स्मार्टफोनच्या पुढील बाजूस आता संपूर्ण डिस्प्ले दिला गेल्यानंतर यापुढच्या स्मार्टफोन्सना कोणता नवीन लुक दिला जाईल याबाबत टेक्‍नॉलॉजीच्या जगामध्ये चर्चा रंगली होती मात्र आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून फोल्डेबल स्मार्टफोन्स हा नवीन अविष्कार लवकरच आपल्या भेटीला येतो आहे.

स्मार्टफोन निर्मिती क्षेत्रामध्ये आघाडीच्या असणाऱ्या सॅमसंग आणि हुवावे या कंपन्यांनी असे फोल्डेबल स्मार्टफोन तयार केले असून ते लवकरच बाजारपेठेत दाखल होणार आहेत. जवळपास टॅबलेटच्या आकाराचे असणारे हे स्मार्टफोन्स वापरकर्त्याला सोयीनुसार फोल्ड अथवा आणि अनफोल्ड करता येणार आहेत. या स्मार्टफोनची रचना एखाद्या पोम्प्लेट प्रमाणे असल्याने त्याला फोल्ड करून ठेवणे अतिशय सोपे ठरणार आहे. दरम्यान अशा फोल्डेबल स्मार्टफोन बाबत इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात क्रेझ असल्याचे दिसून येत आहे. फोल्डेबल डिझाईनमुळे या स्मार्टफोन्सचा उपयोग एखाद्या टॅबलेटप्रमाणे देखील करता येणार आहे. टॅबलेट प्रकारातील स्मार्टफोन्स हे ग्राहकांच्या विशेष पसंतीचे आहेत मात्र मोठा डिस्प्ले असल्यामुळे टॅबलेटला कॅरी करणे अवघड जाते. आता या समस्येवर फोल्डेबल स्मार्टफोनच्या माध्यमातून सोल्युशन मिळाल्याचे दिसते.

असे फोल्डेबल स्मार्टफोन्स या वर्षीच्या अखेरपर्यंत बाजारात दाखल होणार आहेत. आता हे फोल्डेबल स्मार्टफोन्स चोखंदळ असलेल्या टेक्‍नोसॅवी ग्राहकांची पसंती मिळवण्यात यशस्वी होतात का हे पाहणे औत्सुक्‍याचे राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)