तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
नगर: पैशाच्या व्यवहारातून चारा छावणीत तुफान हाणामारी झाली. युवकाला लाकडी दांडके व कोयत्याने मारहाण करण्यात आली. ही घटना मेहेकरी शिवारात घडली.
मारहाणीत अतुल वामन पवार (वय 27, रा. मेहेकरी, ता. नगर) हा गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात बाळासाहेब दादाबा पवार, अनिता बाळासाहेब पवार, शरद बाळासाहेब पवार (सर्व रा. मेहकरी, ता. नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, फिर्यादी व आरोपींतील पैशाच्या व्यवहाराच्या कारणातून बाळासाहेब यांनी अतुल यांना लाकडी दांडक्याने मारले. तसेच अनिता हिने कोयत्याने कपाळावर मारले. तर शरद याने पाठीत मारून त्यांनी मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. मारहाणीत अतुल पवार यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात जखमी अतुल पवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक डाळिंबकर हे करीत आहेत.