फोडाफोडीचे राजकारण लोकशाहीस घातक

आमदार पृथ्वीराज चव्हाण; मलकापुरात स्व. चव्हाण दाम्पत्याला अभिवादन
कराड –
सध्या स्थानिक पातळीपासून ते राज्य व देश पातळीवर सुरु असलेल्या राजकारणात पैसा आणि सत्तेचा वापर करून फोडाफोडीचे जे राजकारण सुरू आहे, ते लोकशाहीला घातक असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

मलकापूर, ता. कराड येथील नगरपरिषदेच्यावतीने दिवंगत आनंदराव चव्हाण व प्रेमलाताई चव्हाण यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. मोहनराव कदम, आ. सतेज पाटील, आ. आनंदराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील, निवास थोरात, मंगल गलांडे, शंकरराव खबाले, शिवराज मोरे, नगराध्यक्षा निलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष इंद्रजित मोहिते, अजितराव पाटील, राजेश पाटील, जयवंत जगताप, इंद्रजीत चव्हाण, अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी, जीवनधर पाटील, नरेंद्र पाटील, विद्या थोरवडे, प्राचार्या मंगल पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.

आ. चव्हाण म्हणाले, दिवंगत प्रेमलाकाकी व आनंदराव चव्हाण यांनी मलकापूरसाठी दिलेल्या योगदानाची आठवण ठेवून मनोहर शिंदे दरवर्षी विविध कार्यक्रम राबवत असतात. नगरपरिषदेने राबवलेल्या पथदर्शी योजनांची शासनानेही दखल घेतली आहे. त्यामुळे या योजना राज्यामध्ये आदर्श ठरल्या आहेत. या यशस्वी करण्यासाठी नागरिकांचे श्रेय आहे. चोवीस तास पाणीपुरवठा योजनेप्रमाणे देशभर पाणी पुरवठा योजना राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महिन्यातून एकदा शेतकरी व महिलांसाठी दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करावे, असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला.

आ. सतेज पाटील म्हणाले, सध्या राजकारणाच्या क्षितिजावर मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत. चांगली कामे करणाराच्या पाठिशी जनता उभी राहते, हे मलकापूरने दाखवून दिले आहे. एका बाजूला नगरपरिषद होऊ नये, म्हणून ज्यांनी प्रयत्न केले, त्यांनीच निवडणुकीमध्ये नगरपरिषद आम्ही केली म्हणून मते मागितली. परंतु, त्यांना त्यांची जागा मलकापूरकरांनी दाखवून दिली आहे.

यावेळी आनंदराव पाटील, सुभाषराव जोशी, अजितराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियानाचा सातवा वर्धापन दिन व बससेवेचा प्रारंभ, प्रियदर्शनी कन्यारत्न योजनेअंतर्गत ठेव पावती वाटप, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर धनादेश व मंजुरी पत्र वितरण, अपंग असणाऱ्या व्यक्तींना एक हजार रुपये पेन्शनच्या धनादेश वाटप, शेतकऱ्यांना फळझाडे व भुईमूग, सोयाबीन, भात बियांणाकरता 50 टक्के अनुदान धनादेश वाटप, महिला बचत गटांना खेळते भांडवल वाटप असे विविध कार्यक्रम पार पडले. प्रास्तावीक मनोहर शिंदे यांनी केले. ज्ञानदेव साळुंखे, पी. डी. तांदळे, एस. एस. पवार यांनी सुत्रसंचालन केले. आनंदा शिंदे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)