नगर शहरात आता फुलणार हिरवाई

नगर – नगर शहरात आता हिरवाई फुलू लागली आहे. महापालिकेच्या वतीने केंद्र व राज्य सरकारच्या सहयोगाने शहरात 26 ठिकाणी हरित क्षेत्र विकास प्रकल्प राबविला जात आहे. यासाठी सुमारे 3 कोटी रुपयांचा निधी महापालिकेला मिळाला असल्याची माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली.

सीना सुशोभीकरणाचे काम लवकरच ः वाकळे
शहरात हरित क्षेत्र विकास प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यावर लवकरच 2 कोटी 14 लाख रुपये खर्चाच्या सीना नदी सुशोभिकरणाचे कामही सुरू केले जाणार असल्याची माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली. हे काम 3 टप्प्यात केले जाणार असून सीना नदी परिसरात मोठ्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. काही ठिकाणी जॉगिंग ट्रॅक, नागरिकांना बसण्यासाठी बाकडे ठेवण्यात येणार आहेत. महापालिकेचे प्रकल्प अभियंता राजेंद्र मेहेत्रे व अतिक्रमण विभाग प्रमुख सुरेश इथापे यांच्यावर या दोन्ही प्रकल्पांची जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचे महापौर वाकळे यांनी सांगितले. 

केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत हरित क्षेत्र विकास प्रकल्पाला राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. महापालिकेच्या 3 कोटी रुपयांच्या विविध कामांच्या प्रस्तावास त्यामुळे मंजुरी मिळाली आहे. या कामांपैकी 9 कामे सुरु होवून ती पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत, तर 17 कामांना लवकरच सुरुवात होवून ती जुलै ऑगस्टमध्ये पूर्ण केली जाणार आहेत.

ही कामे पूर्ण झाल्यावर शहरात 26 ठिकाणी हरित क्षेत्र विकासाला चालना मिळणार आहे. शहराच्या हरित क्षेत्र विकास प्रकल्पासाठी 3 कोटी निधी खर्च केला जाणार आहे. त्यापैकी 50 टक्‍के निधी केंद्र सरकारकडून तर राज्य सरकार व महापालिका यांचा प्रत्येकी 25 टक्के निधी असेल.

शहरात हरित क्षेत्र विकास प्रकल्प राबविण्यासाठी निवडलेल्या 26 ठिकाणांपैकी सुरु होवून पूर्णत्वाच्या मार्गावर असलेल्या कामांमध्ये आदर्श नगर, भाग्योदय कॉलनी, आसरा सोसायटी, अष्टविनायक कॉलनी, विरंगुळा मैदान, आगरकर मळा, कर्डिले निवास, तिर्थंकर कॉलनी, मधुबन कॉलनी, मातोश्री उद्यान या कामांचा समावेश आहे.

त्यापैकी शहरात 17 ठिकाणी हरित क्षेत्र विकासाचे काम सुरु केले जाणार आहेत. त्यामध्ये साईनगर , चैतन्यनगर, गोविंदपुरा, आगरकर मळा, आहेर कॉलनी, बोल्हेगाव सर्व्हे नं.71, नंदनवन कॉलनी, रेणुकानगर, रुपमातानगर, रेणावीकर कॉलनी, श्रीनाथ कॉलनी, श्रीनाथ कॉलनी, ताराबाग, भूषणनगर, अयोध्यानगर, कानडे मळा, सारसनगर-फुलेनगर, प्रेम भारतीनगर या ठिकाणांचा समावेश आहे. हरित क्षेत्र विकासासाठी निवडलेल्या भागात देशी वृक्षांचे रोपण करून हिरवाई फुलविण्यात येणार आहे. यामध्ये चिंच, आंबा, अर्जुन, हिरडा, बेहडा, वटवृक्ष, उंबर, पिंपळ, मोहगणी, रीटा, बकुळ, सिसम, बांबू, बोर, मावळा, आवळा, भेंडी, अशोक आदी वृक्षांची लागवड केली जाणार आहे. याशिवाय शोभिवंत फुलझाडे, लहान मुलांसाठी, खेळणी, लॉन विकसित केले जाणार आहे. ही झाडे लावल्यानंतर सर्व झाडांना ठिबक सिंचनाद्वारे पाण्याची व्यवस्था केली जात आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)