आंतरराज्यीय श्रीधर भाई गॅंगच्या पाचजणांना मोका

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई

कोल्हापूर, (प्रतिनिधी) – कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील आजरा, चंदगडसह सिंधुदूर्ग व गोवा राज्याचे पूर्व भागात अवैध मद्य तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय कुप्रसिध्द श्रीधर भाई गॅंगला मोका लावण्यात आला. मंगळवारी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी ही कारवाई केली.
गॅंगचा म्होरक्‍या संशयित श्रीधर अर्जुन शिंगटे (वय 35, रा. इंचनाळ, ता. गडहिंग्लज) असून नेल्सन ईजामाईल फर्नांडीस उर्फ बाबा नेल्सन (30, रा. सालेवाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदूर्ग), चेतन विनायक साठेलकर (30, रा. भटवाडी बाहेरचा वाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदूर्ग), यशवंत चंद्रकांत कारीवडेकर (35, रा. ज्युस्तीनगर, सावंतवाडी, जि. सिंधुदूर्ग), कृष्णा अनिल म्हापसेकर (रा. मेनगार्डन, जवळ सावंतवाडी) अशी त्याच्या साथीदारांची नावे आहेत.

कुप्रसिध्द गुंड श्रीधर शिंगटे हा साथीदारांच्या मदतीने खूनाची सुपारी घेवून अवैध अग्नीशस्त्राचा वापर करुन खून करणे, प्राणघातक शस्त्रानिशी दरोडा, खंडणी, पैशांच्या वसुलीसाठी अपहरण, जबरी चोरी असे गंभीर गुन्हे करीत होता. त्याचे विरोधात संघटीत गुन्हेगारीचे नऊ गुन्हे दाखल आहेत.

आंतरराज्यीय मद्य चोरीमध्येही त्यांची व्याप्ती मोठी होती. संशयित शिंगटे व नेल्सन फर्नांडीस यांचा निष्पन्न झालेला सहभाग, तसेच सीमावर्ती भागातील पट्टयामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांना प्रभावीत करण्याचे हेतूने या गॅंगचा वापर होवू शकतो. त्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गडहिंग्लज विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे व पोलीस उपअधीक्षक अनिल कदम यांना शिंगटे गॅंगच्या विरोधात मोका कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)