श्रीनगर: सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाच जणांना अटक केली. शोपियॉं जिल्ह्यात त्यांना पकडण्यात आले. ते हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेला विविध प्रकारचे सहाय्य करत असल्याचे स्पष्ट झाले. आयईडीचे स्फोट घडवून सुरक्षा जवानांना लक्ष्य करण्याचा कट हिज्बुलने रचल्याचे अटक करण्यात आलेल्यांनी चौकशीदरम्यान सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीवरून एका ठिकाणावरून एक आयईडीही जप्त करण्यात आला. पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेने जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये फेब्रुवारीत भयंकर आत्मघाती हल्ला घडवला. त्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात आणखीच आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. त्यातून सुरक्षा दलांकडूून राबवण्यात येत असलेल्या धडक मोहिमांचा मोठा फटका दहशतवादी संघटनांना बसत आहे.