महाआघाडीतल्या 56 पक्षांच्या पराभवासाठी महायुतीचे पाच पांडव पुरेसे- मुख्यमंत्री

कोल्हापूर:  महाराष्ट्रात बोलघेवडे लोक खूप आहेत त्यातच हल्ली बारामतीचा पोपट खूप बोलू लागला आहे आमचे कपडे कोणीच करू शकणार नाही पण तुमच्या अंगावर आता काही शिल्लकच राहिले नाही अशी टीका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरात केली आहे तसेच आमची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी तर तुमची काय भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी का ? असा सवाल देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.

येथील तपोवन मैदानावर भाजप-शिवसेना युतीच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार प्रारंभ सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी श्रीफळ वाढवून लोकसभेच्या प्रचाराचा शुभारंभ केला. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील, रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह इतर घटक पक्षांचे नेतेही उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देश चालविण्यासाठी ५६ पक्ष लागत नाहीत. त्यांच्यावर भरवश्यावर देश चालत नाहीत. ५६ इंचाची छाती लागते. शेतकरी, सर्वसामान्यांच्या पाठीशी राहणारे आमचे पक्ष आहे. भाजप, सेना आणि मित्रपक्षांच्या माध्यमातून जनतेच्या पाठबळावर बलशाली सरकार सत्तेमध्ये येणार आहे. आता केवळ लीड मोजणे बाकी आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

फडणवीस म्हणाले, मुंबईत अरबी महासागर आणि कोल्हापुरात जनतेचा महासागर आहे. आम्ही एकत्रपणे पुढे जात आहोत. भाजप-सेनेची युती सत्तेसाठी नाही. विचारांची युती आहे. आमचा हिंदुत्ववाद संकुचित नाही. जाती, भाषेच्या पलीकडील हिंदुत्ववाद आहे. केवळ नावामध्ये राष्ट्रवादी असून चालत नाही. मनात राष्ट्रवाद असावा लागतो. महाआघाडीतल्या 56 पक्षांच्या पराभवासाठी महायुतीचे पाच पांडव पुरेसे आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाआघाडीचा समाचार घेतला. कॅप्टनने सुद्धा माढातून माघार घेतली आहे. ओपनिंग बॅट्समनच म्हणतोय की मी बारावा गडी म्हणून काम करतो. माढ्यातून माघार घेणाऱ्या शरद पवारांना टोला हाणण्याची संधी देखील फडणवीसांनी सोडली नाही.

राज ठाकरेंवर टीका करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बारामतीच्या पोपटाला सांगू इच्छितो की आमचे कपडे कोणी उतरवू शकत नाही. तुमचे आधी विधानसभेत आणि मग लोकसभेत कपडे उतरले, मुंबई महापालिकेत उरलेलं लंगोटही उद्धव ठाकरेंनी उतरवलं. पोपटाला सल्ला देतो की मोदी सुर्यासारखे आहेत, त्यांच्यावर थुंकलात तर थुंकी तुमच्याच तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही. कोणाची सुपारी घेण्यापेक्षा दुपारी घरी शांत बसा आणि मोदी कसे पंतप्रधान बनतात ते पाहा.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, विरोधकांमध्ये आता कोणी शिल्लक राहिले नाही. जागा वाटपवारुन त्यांच्यामध्ये वाद सुरू आहे. गिरीश महाजन दिसले की, विरोधकांना धडकी भरते. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची अवस्था पंक्चर असलेल्या टायर सारखी झाली आहे. आम्ही मांडलेले प्रश्न मुख्यमंत्र्यांनी मार्गी लावले आहेत,

लोकसभेची ही लढाई नसून देशाचं संरक्षण करणारी आणि जे देशाचं संरक्षण कधीच करु शकले नाही यांच्यातील ही लढाई आहे, अशी टीका चंद्रकांत पाटलांची केली आहे. ज्या चार जागांच्या जोरावर शरद पवार देशात राजकारण करतात, त्यातली एकही जागा यावेळेस जिंकू देणार नाही, असं आव्हानही चंद्रकांत पाटलांनी दिलं.

पश्चिम  महाराष्ट्रातील दहाही जागा युतीच्या असतील. अजूनही वेळ गेलेली नाही, शरद पवारांनी जसा स्वतः पळ काढला, तसं मुलीला आणि नातवाला तरी का पुढे करताय, उमेदवारी अर्ज मागे घ्या, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)