पिंपरी – फर्निचर आणि अन्य वस्तुंची कंपनी स्थापन करून त्यातून मोठ्या प्रमाणात नफा मिळत असल्याचे भासवून सहा नातेवाईकांनी एका व्यावसायिकांची पाच कोटी सात लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 25 मे 2016 ते 26 नोव्हेंबर 2018 या कालावधीत वाकड येथे घडला.
या प्रकरणी रमेश श्रीमंत घोलप (वय 50, रा. गहुंजे, ता. मावळ) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेत प्रदुम्न निर्मळ, गीता प्रदुम्न निर्मळ, श्रीहरी बापूराव निर्मळ (सर्वजण रा. वाकड), गुरुलिंग ज्ञानोबा अंदिल, जयराम गुरुलिंग अंदिल (सर्वजण रा. भोसरी), दिनेश धुमाळ (रा. वाई जि. सातारा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश व इतर आरोपी नातेवाईक आहेत. आरोपींनी रमेश यांना फर्निचर व इतर वस्तुंच्या व्यवसायातून नफा कमवून देतो म्हणून रमेश व अन्य दोघांकडून प्रत्येकी दीड कोटी असे एकूण साडेचार कोटी रुपये घेतले. गुंतवलेले साडेचार कोटी व 57 लाख रुपये नफा अशी एकूण 5 कोटी 7 लाख रुपयांची रमेश यांची फसवणूक आरोपींनी केली.