भाजपच्या पाच विद्यमान खासदारांचा पत्ता कट?

किरीट सोमय्यांना उद्धव ठाकरेंवरील टीका भोवणार

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील पाच खासदारांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार नसल्याचे सूतोवाच भाजपने केले आहे. तिकीट नाकारले जाण्याची शक्‍यता असलेल्यांमध्ये पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांचाही समावेश असल्याचे संकेत मिळत आहेत.

कामगिरी आणि इतर कारणांवरून पाच विद्यमान खासदारांना पुन्हा संधी मिळणार नसल्याची माहिती भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली. संबंधित खासदारांमध्ये शिरोळे यांच्याबरोबरच किरीट सोमय्या (मुंबई उत्तर पूर्व), शरद बनसोडे (सोलापूर), सुनील गायकवाड (लातूर) आणि दिलीप गांधी (अहमदनगर) यांचा समावेश असल्याचे त्या नेत्याने सूचित केले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने केलेली टीका सोमय्या यांना भोवणार असल्याचे समजते. सोमय्या यांना पुन्हा उमेदवारी देण्यास शिवसेनेने तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यांना पुन्हा तिकीट दिल्यास विरोधात मतदान करण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे. तर आपापल्या मतदारसंघांमध्ये प्रभाव पाडण्यात अपयशी ठरल्याने इतरांचा पत्ता कापण्यात येणार असल्याचे भाजपच्या दुसऱ्या नेत्याने सांगितले. सध्या महाराष्ट्रात भाजपचे 22, तर मित्रपक्ष शिवसेनेचे 18 खासदार आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)