इंटेरियरसाठी फिश टॅंक

काही वर्षांपूर्वी हौसेखातर मासे पाळले जायचे. घरात तेवढ्यासाठी फिश टॅंक आणले जायचे. काही वेळा मुलांनी हट्ट केला म्हणून तर काही वेळा वास्तुशास्त्राच्या दृष्टीने शुभ म्हणून फिश टॅंक आणले जायचे. पण आता काळ बदलला तसे इंटेरियरच्या दृष्टीनेही फिश टॅंकचे महत्त्व वाढू लागले आहे.

सजावटीत भर घालण्यासाठी घरात आकर्षक मत्स्यालय तयार केले जाते. त्यामुळे फिश टॅंकसाठी बरेच पर्यायदेखील उपलब्ध झाले आहेत. अलीकडे अतिशय मोठे असे फिश टॅंक घरात ठेवण्याचा ट्रेंड आहे. हा फिश टॅंक भिंतीत बसवून अधिक लक्षवेधी केला जातो. यामुळे वेगळ्या प्रकारचे वॉल डेकोरेशन होते आणि त्यातील माशांनाही मोकळी जागा मिळते. टीपॉय, डायनिंग टेबलमध्येदेखील फिश टॅंक बसवले जातात. लहान घर असल्यास शक्‍यतो लहानच आकाराचा फिश टॅंक निवडावा. भिंतीवरील बुकशेल्फच्या मधल्या भागातही फिशटॅंक बसवता येतो. अर्थात, घराची रचना आणि उपलब्ध जागा यानुसार आपण फिश टॅंकचे स्वरूप ठरवू शकतो.

फिश टॅंकची सजावटही वेगवेगळ्या प्रकारे करता येते. नेहमीप्रमाणे चौकोनी काचेच्या बॉक्‍समध्ये फिशटॅंक बनवण्याऐवजी आता याचे विविध आकार बघायला मिळतात. घराची सजावट यामुळे अधिक आकर्षक कशी होईल याचा विचार केला जातो. फिश टॅंकच्या सजावटीसाठी बाजारात विविध वस्तू मिळतात. निरनिराळ्या रंगांचे, आकाराचे दगड, अगदी खरीखुरी वाटतील अशी प्लॅस्टिकची झाडे, झुडपे टॅंकमध्ये ठेवली जातात. इतकेच नाही तर टॅंकच्या आतल्या बाजूने आकर्षक प्रकाशयोजना केली जाते. फिश टॅंक आकर्षकरित्या सजवला तरीही तो ठेवण्यासाठी चांगला स्टॅंडही आवश्‍यक असतो. एखाद्या टेबलवर किंवा लहान कपाटावर टॅंक ठेवण्याऐवजी खास स्टॅंडवर ठेवला तर अधिक खुलून दिसतो. असे आकर्षक स्टॅंड बाजारात उपलब्ध आहेत. लाकूड, मेटल यापासून हे स्टॅंड बनवले जातात.

मोठा फिश टॅंक नको असेल, पण केवळ आवड म्हणून एक-दोन मासे पाळायचे असतील तर फिश बाऊल हा उत्तम पर्याय आहे. यातही बरेच आकार आणि प्रकार उपलब्ध आहेत. वॉलफिशसारखेही फिश बाऊल बाजारात आहेत. फिश बाऊल आकाराने लहान असल्यामुळे त्यात सजावटीच्या जास्त वस्तू ठेऊ नये. बाऊल मोठा असल्यास त्यात काही प्रमाणात स्टोन वापरता येतील. फिशटॅंक ठेवताना घरातील आकर्षकतेबरोबरच सुरक्षिततेचीही काळजी घ्यावी. धक्‍का लागून ते पडणार नाही, अशी जागा शोधावी. तसेच सूर्यप्रकाश थेटपणे येत असलेल्या ठिकाणी फिशटॅंक ठेवू नये. यामुळे काच तडकू शकते. अशा प्रकारे योग्य विचार करून फिशटॅंकची निवड केल्यास घराच्या सजावटीत यामुळे नक्‍कीच भर घालता येऊ शकते.

– मिथिला शौचे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)