परकीय व्यापारातील तूट वाढली 

निर्यातीपेक्षा आयात वाढली : रुपयाच्या मूल्यावर दबाव येण्याची शक्‍यता 
नवी दिल्ली: जून महिन्यात निर्यात 17.57 टक्‍क्‍यानी वाढून 27.7 अब्ज डॉलर झाली आहे. मात्र, याच काळात आयात 21.31 टक्‍क्‍यांनी वाढून 44.3 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. त्यामुळे भारताची व्यापारातील तूट 16.6 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. या 43 महिन्यांचा उच्चांक आहे. त्यामुळे भारताला निर्यात वाढविण्यासाठी नेटाने प्रयत्न करावे लागणार आहेत. याअगोदर नोव्हेंबर 2014 मध्ये भारताची व्यापारातील तूट 16.86 अब्ज डॉलरवर गेली होती. आता एप्रिल ते जून या काळातील व्यापारातील तूटही 14.21 टक्‍क्‍यांनी वाढून 82.47 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. यामुळे रुपयाच्या मूल्यावर आणखी दबाव येण्याची शक्‍यता असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. बॅंका छोट्या उद्योगांना कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे या क्षेत्राकडून होत असलेल्या निर्यातीवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.
फिटो या निर्यातदारांच्या संघटनेचे अध्यक्ष गणेश गुप्ता यांनी सांगितले की, भांडवलाच्या टंचाईमुळे निर्यातीवर परिणाम होत आहे. याबाबत आम्ही सरकारकडे बोलणी करीत आहोत. यातून शक्‍य तितक्‍या लवकर मार्ग काढण्याची गरज आहे. जर निर्यात वाढली नाही तर व्यापारातील तुटीमुळे चालू खात्यावरील तूट वाढणार आहे. त्याचबरोबर वित्तीय तुटीवरही परिणाम होण्याची शक्‍यता आहे. निर्यात वाढविण्यासाठी सरकारने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी काल नवी दिल्लीत जागतिक बॅंकेच्या गटाची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. व्यापार, प्रादेशिक एकात्मिक आणि गुंतवणूक वातावरण या विभागाच्या संचालक कॅरोलिन फ्रुएन्ड यांच्या नेतृत्वाखालील गटामध्ये भारतासाठीचे संचालक जुनैद अहमद यांचा समावेश आहे. भारतात व्यापार, गुंतवणूक आणि सुविधांच्या क्षेत्रात होत असलेल्या विकासाला जागतिक बॅंकेचा आधार देण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर या बैठकीत चर्चा झाली.
भारतात राष्ट्रीय एकात्मिक सुव्यवस्थित सुविधा धोरण राबवण्यासाठी वाणिज्य मंत्रालयाने केलेल्या कामांची माहिती मंत्र्यांनी यावेळी दिली. या धोरणांतर्गत भारतात माल साठवण्यासाठी गोदामे आणि इतर सुविधा वाढविल्या जात आहेत त्याशिवाय वाहतूक व्यवस्था आणि इतर पायाभूत सुविधा जिल्हा पातळीपासून तयार करण्यावर सरकारचा भर आहे. भारताचा निर्यात व्यापार 100 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढविण्यासाठी काही विशिष्ट उत्पादने आणि बाजारपेठांची निवड करण्यात आली असून व्यापार वाढविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे प्रभू यांनी सांगितले. भारतात सुव्यवस्थित सुविधा अधिक कार्यक्षम करण्यात येणारे अडथळे ओळखून ते दूर करण्यासाठी आणि भारतीय उत्पादने जागतिक मूल्यसाखळीशी जोडण्यासाठी जागतिक बॅंक आणि संबंधित मंत्रालये यांची एक संयुक्‍त कार्यशाळा घेतली जावी, असा निर्णय या बैठकीत झाला.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)