पहिली विश्‍व मल्लखांब अजिंक्‍यपद स्पर्धा: महिला सांघिक गटात भारतीय संघाला विजेतेपद

मुंबई: पहिल्या जागतिक मल्लखांब स्पर्धेत महिला गटाचे सांघिक विजेतेपद भारताने पटकावले. तर, द्वितीय स्थानी सिंगापूर आणि तृतीय स्थानी मलेशियाला समाधान मानावे लागले. भारताच्या दीपक शिंदे आणि हिमानी परब यांना सर्वोत्तम मल्लखांबपटू म्हणून गौरवण्यात आले.

विश्‍व मल्लखांब फेडरेशनच्या विद्यमाने आणि भारतीय मल्लखांब महासंघ तसेच महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटना यांच्या वतीने संपन्न झालेल्या मुंबईमधील श्री समर्थ व्यायाम मंदिर आयोजित पहिल्या विश्‍व मल्लखांब अजिंक्‍यपद स्पर्धेत महिला सांघिक गटात भारतीय संघाने बाजी मारली.

या दोन दिवसीय विश्‍व मल्लखांब अजिंक्‍यपद स्पर्धेमध्ये संपूर्ण विश्‍वामध्ये मल्लखांबाचा प्रसार करणाऱ्या भारताच्या महिला संघाने सांघिक विजेतेपदाच्या प्रथम क्रमांकावर 244.73 गुण मिळवून आपले नाव नोंदवले आहे तर 44.45 गुण मिळवून सिंगापूरने आणि 30.22 गुण मिळवून मलेशियाने अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेमध्ये जवळपास 150 हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी प्रत्येक खेळाडूला दोरी आणि पुरलेला मल्लखांब अशा दोन साधनांवर दोन लहान आणि दोन मोठे असे चार संच करणे अनिवार्य होते. महिला आणि पुरुष वयोगटातून निवडल्या गेलेल्या सर्वोत्तम दहा खेळाडूंमध्ये वैयक्तिक अजिंक्‍यपदासाठी स्पर्धा क्रमांक दोनमध्ये चुरस रंगली. तर, स्पर्धा क्रमांक तीनचे विजेतेपद साधनांवर केल्या जाणाऱ्या लहान आणि मोठ्या संचांमधील सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात आले.

स्पर्धेच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने महिला विभागात द्वितीय आलेल्या इटलीच्या डेलिया सेरुटीने दोरी मल्लखांबावर तर जपानच्या कोइको टाकेमोटोने पुरलेल्या मल्लखांबावर आपले संच सादर केले. पुरुष विभागातून दीपक शिंदे आणि सागर ओहळकर यांनी दोरी आणि पुरलेल्या मल्लखांबावर आपले कौशल्य सादर केले. नुकतंच जीवन गौरव पुरस्कराने सन्मानित केलेल्या उदय देशपांडे यांच्या जर्मनीमधील मल्लखांब खेळाडूंनी संगीताच्या चालीवर आपले मनोरे सादर केले. श्री समर्थ व्यायाम मंदिरात प्रशिक्षण घेणार्या दोन योगासनपटूंनी योगासनाचे चित्तथरारक प्रात्यक्षिक केले.

सांघिक निकाल (मुली)
1. भारत (244.73 गुण), 2. सिंगापूर (44.45 गुण), 3. मलेशिया (30.22 गुण)
वैयक्तिक विजेतेपद (मुली)
1. हिमानी परब (74.70, भारत), 2. प्रतीक्षा मोरे (74.40, भारत) 3 . किको ताकेमोतो (53.10, जपान)
वैयक्तिक विजेतेपद (मुले)
1. दीपक शिंदे (84.30, भारत), 2. सागर ओव्हळकर, (83.70, भारत), 3. सेबॅस्टियन क्रिमर (37.25, जर्मनी)
दोरीचा मल्लखांब मुले (मोठा सेट)
1. सागर ओव्हळकर (भारत), 2. दीपक शिंदे (भारत), 3. सेबॅस्टियन क्रिमर (जर्मनी);
पोल मल्लखांब मुले (मोठा सेट)
1. सागर ओव्हळकर (भारत), 2. दीपक शिंदे (भारत), 3. मयूर दलाल (जर्मनी)
पोल मल्लखांब मुले (लहान सेट)
1. सागर ओव्हळकर (भारत) 2. दीपक शिंदे (भारत), 3. मयूर दलाल (जर्मनी)
दोरीचा मल्लखांब मुले (लहान सेट)
1. दीपक शिंदे (भारत), 2. सागर ओव्हळकर (भारत), 3. सेबॅस्टियन क्रिमर (जर्मनी)
पोल मल्लखांब मुली (लहान सेट)
1. किको ताकेमोतो (जपान) 2. डेलिया सेरुटी (इटली), 3. हिमानी परब (भारत)
दोरीचा मल्लखांब मुली (लहान सेट)
1. हिमानी परब (भारत), 2. प्रतीक्षा मोरे (भारत) 3 . डेलिया सेरुटी (इटली)
पोल मल्लखांब मुली (मोठा सेट)
1. किको ताकेमोतो (जपान) 2. डेलिया सेरुटी (इटली), 3. हिमानी परब (भारत)
दोरीचा मल्लखांब मुली (मोठा सेट)
1. हिमानी परब (भारत), 2. प्रतीक्षा मोरे (भारत) 3 . डेलिया सेरुटी (इटली)

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)