राज्यात “रेरा’अंतर्गत कल्याणमध्ये पहिली कारवाई

बांधकाम व्यावयासिकाला दणका 

घराचा लिलाव करुन व्याजासह पैसे देण्याचा आदेश

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कल्याण: बांधकाम व्यावसायिकांच्या त्रासातून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अस्तित्त्वात आलेल्या रेरा कायद्यांतर्गत आज कल्याणमध्ये पहिली कारवाई करण्यात आली आहे. घराचा लिलाव करुन ग्राहकाला त्याचे पैसे व्याजासह परत करण्याचे आदेश महारेरा प्राधिकरणाने दिले आहे. या कारवाईने बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.
केंद्राने सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी 2016 साली रेरा कायदा पारित केला. या कायद्याचा महाराष्ट्रातला पहिला झटका कल्याणच्या एका बिल्डरला बसला आहे. आश्वासन देऊनही वेळेत घराचा ताबा न दिल्याने घराचा लिलाव करुन ग्राहकाला त्याचे पैसे व्याजासह परत करण्याचे आदेश महारेरा प्राधिकरणाने दिला आहे.

ठाण्यातील रहिवाशी निखिल साबळे खासगी कंपनीत नोकरी करतात. साबळेंनी 2013 साली आंबिवलीच्या कांबार कंस्ट्रक्‍शन कंपनीमार्फत सुरु असलेल्या फाल्को वर्ल्ड या प्रकल्पात 2 बीएचके फ्लॅट बुक केला. या फ्लॅटचा ताबा 2015 पर्यंत देण्याचे आश्वासन बिल्डर रोहित शुराणी यांनी दिले होते. मात्र ते पूर्ण झाले नाही.याबाबत निखिल साबळे यांनी बिल्डरला विचारणा करत अतिरिक्त वेळेचे घरभाडे आणि व्याजाची मागणी केली. मात्र बिल्डरने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने निखिल यांनी 2017 साली महारेराकडे धाव घेतली.

महारेराने बिल्डरला साबळे यांचे पैसे परत करण्याचे आदेश दिले होते, मात्र याविरोधात बिल्डरने रेव्हेन्यू ट्रिब्युनलमध्ये धाव घेतली. तिथे त्याची याचिका पहिल्याच दिवशी फेटाळून लावण्यात आली. यानंतर मात्र महारेराने जिल्हाधिकाऱ्यांना साबळे यांचा फ्लॅट जप्त करुन त्याचा लिलाव करा आणि त्यातून येणारी रक्कम साबळे यांना सव्याज परत करा, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे बिल्डरचे धाबे चांगलेच दणाणले.

दुसरीकडे कल्याणचे तहसीलदार अमित सानप यांनी लिलावाच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या प्रकरणी आम्ही बिल्डरची बाजू जाणून घेण्याचाही प्रयत्न केला. मात्र बिल्डरकडून कुठलाही प्रतिसाद देण्यात आला नाही असे त्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)