आनेवाडीत टोलनाक्यावर गोळीबार

टोल कर्मचारी गंभीर, गोळीबार करणारे पुण्यातील सराईत गुन्हेगार

भुईंज –
ग्वाल्हेर बंगळूरू आशियाई महामार्गावर आनेवाडी टोल नाक्‍यावर पुणे येथील सराईत गुन्हेगार रोहिदास उर्फ बापू चोरगे याच्यासह दहा ते बारा जणांनी टोलकर्मचाऱ्यावर पिस्तुल रोखत गोळीबार केला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी या गुडांनी एका कर्मचाऱ्याला दगडाच्या सहाय्याने गंभीर जखमी केले आहे. हा सर्व प्रकार रविवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडला असून घटनेनंतर तत्काळ जिल्हा पोलीस प्रमुख सातपुते यादेखील टोलनाक्‍यावर दाखल झाल्या. यावेळी टोलनाक्‍यावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होता.

अधिक माहिती अशी की, कोल्हापूर येथील शिवसेनेचा कार्यकर्ता मेळाव्याचा कार्यक्रम आटोपून पुण्याकडे जात आसणारी स्वीफ्ट कार (एमएच 12 एनवाय 302) रात्री 1 वाजण्याच्या सुमारास आनेवाडी टोल नाक्‍यावरील लेन क्र. 1 वर आली असता तेथील उपस्थित कर्मचाऱ्यांनी टोलचे पैसे मागितले. यावर पैसे न देताच कार पुढे निघून गेली पण टोल कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून कार थांबवली व टोलचे पैसे मागण्यास सुरुवात केली. त्यावर कारमधील युवक म्हणाले, आम्ही खेड शिवापूर येथे टोल नाक्‍याचे पार्टनर आहोत. त्यामुळे आम्ही टोल भरणार नाही. त्यानंतर कारमधील युवक बाहेर उतरून शिवीगाळ व मारहाण करून त्यांनी दहशद माजवली व तुम्हाला आताच दाखवतो असा दम दिला व पाठी मागील एमएच 12 केवाय 6466 ही कार लगेचच लेननंबर 1 वर पोचली व त्यांनी येऊन आनेवाडी टोलनका व्यवस्थापक विकास शिंदे यांच्या समक्ष रोहिदास उर्फ बापू चोरगे याने आवार्च्य भाषेत शिव्या देत माझ्या माणसांना का अडवल? असा दम दिला व त्याने आपल्या जवळील पिस्तुल काढून कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने एक गेळी फायर केली.

त्यावेळी टोल कर्मचारी सैरावैरा पळू लागले. त्याचवेळी त्या टोळीतील एकाने स्वत: जवळच्या पिस्तुलमधून पुन्हा कर्मचाऱ्याच्या दिशेला गोळीबार केला. सुदैवाने या दोन्ही झालेल्या गोळीबारामध्ये कोणीही जखमी झाले नाही. पण विशाल दिनकर राजे (रा. लिंब) हा टोल कर्मचारी त्यांच्या तावडीत सापडल्याने त्याला खाली पाडून लाथा बुक्‍या आणि दगडाने मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी सातारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टोलनाका व्यस्थापक विकास शिंदे यांना बापू चोरगे याने जोरजोरात ओरडून पिस्टल दाखवत आमच्या आगाला हात लावाल तर बघुन घेऊ असा दम देऊन सर्वजण त्याच्या वाहनातून निघून गेले. या गंभीर घटनेची माहिती भुईंजचे सपोनि शाम बुवा यांनी तातडीने जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते याना देताच त्या तातडीने आनेवाडी टोलनाक्‍यावर
दाखल झाल्या. त्याच्यासमवेत अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख धीरज पाटील, वाईचे डीवायएसपी अजित टिके, कराडचे डीवायएसपी नवनाथ ढवळे, दहिवडीचे डीवायएसपी वडनरे व पीएसआय साळी हे उपस्थित होते. यावेळी आनेवाडी टोल नाक्‍याला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

जिल्हा पोलीस प्रमुखांनी तातडीने पळून गेलेल्या आरोपीना पकडण्यासाठी चार वेगवेगळी पथके तयार करून पुणे मुंबईकडे पाठविले आहेत. रोहिदास उर्फ बापू चोरगे हा पुण्यातील नामांकित गुड असून त्याच्यावर पुणे येथील विविध पोलीस ठाण्यात अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असून तो मोका आणि तडीपारीच्या गुन्ह्या मधून नुकताच जामिनवर आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणाची तक्रार टोलनाका इंचार्ज पांडुरंग घनशाम पवार (वय 37, रा. चिंधवली) याने भुईंज पोलीस ठाण्यात दिले आहे. याचा आधिक तपास सपोनि शाम बुवा करीत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)