उद्योगनगरीत रोज आगीशी सामना

संग्रहित छायाचित्र.......

वाढला निष्काळजीपणा ः आग लागण्याचे प्रमाण वाढले
दोन महिन्यात दोनशेहून अधिक घटना
अत्यल्प मनुष्यबळावर करताहेत आगीशी दोन हात अग्निशामक दलाची रोज तारेवरची कसरत

पिंपरी – राज्यभरत औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात दहा हजाराहून अधिक छोटे-मोठे उद्योग आहेत. या उद्योगांमध्ये लाखो कामगार आपल्या पोटाची खळगी भरत आहेत. मात्र, या औद्योगिक नगरीमध्ये आगीच्या बाबतीत आवश्‍यक ती “सेफ्टी’ ठवेली जात नसल्याचे प्रकर्षाने समोर येत असून प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात आगीच्या घटनेमध्ये होत असलेली वाढ चिंताजनक आहे. या शिवाय वाढत्या घटनेमुळे शहराच्या अग्निशामक विभागाच्या जवांनानाही दरररोज आगीचा सामना करावा लागत आहे.

तोकड्या मनुष्यबळासह रस्त्यावरील अडथळ्यांची आणि अडचणींची शर्यत त्यांना पार करावी लागत आहे. यावर्षी उन्हाळा अधिकच कडक असल्याने आगीच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचे दिसून आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात या उन्हाळ्यातही आगीच्या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यावर्षी तर उन्हाळ्याच्या दोन महिन्यात आग लागण्याच्या घटनेने विक्रमच केला आहे. केवळ एप्रिल आणि मे महिन्यात दोनशेहून अधिक आगीच्या घटना घडल्या आहेत. या आगीत काही किरकोळ होत्या तर, काही आगी या भीषण होत्या. त्यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

उन्हाळ्यामध्ये आग लागल्याचे प्रमाण शहरातील विशिष्ट भागात अधिक असल्याचे आकडेवारीवरुन समोर येते. शहरातील चिखली, कुदळवाडी या परिसरात भंगार मालाची अनेक गोदामे आहेत. त्यात उन्हाळयात हमखास आग लागल्याच्या घटना घडतात. त्यामुळे अग्निशमन दलास तेथे उपाययोजना करण्यासाठी कायम तत्पर राहावे लागते.

उद्योग-व्यवसायांमध्ये आगीचे प्रमाण वाढले
गेल्या दोन महिन्यातील भीषण आगीच्या घटना पाहता व्यवसाय, उद्योग आणि गोदामांमध्ये आगीचे प्रमाण वाढले आहे. उद्योग-व्यवसायाच्या ठिकाणी आग लागू नये, याची काळजी घेणे अत्यावश्‍यक असते. आग लागलीच तर तातडीने नियंत्रणात यावी, यासाठी सक्षम यंत्रणा आणि आग विझविण्याचे प्रशिक्षण घेतलेले अधिकारी व कर्मचारी असणे गरजेचे आहे. परंतु उद्योग आणि व्यवसायांमध्ये लागलेली आग विझविण्यासाठी डझनभर बंब वापरावे लागले आणि कित्येक तास अग्निशामक दलांच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले आहेत.

यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा उष्णतेचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे, आगीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तरीही, अग्निशामक दलाच्या वतीने जनजागृती करुन तसेच काही ठिकाणी गस्त वाढवून आगीच्या घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शहरात लागलेल्या आगींवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल नेहमीच तत्परपणे काम करीत असल्याने प्रत्येक वेळी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

– किरण गावडे, मुख्य अग्निशमन अधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)